चंद्रशेखर बोबडे

विविध क्षेत्रातील रोजगार घटल्याचा परिणाम राज्यातील रोजगार मेळाव्यांतून कुशल कामगारांना रोजगार देण्यावरही झाला आहे. २०१७-१८ मध्ये या मेळाव्यातून ६१ हजार तरुणांच्या हाताला काम मिळाले होते. २०१८-१९ मध्ये ही संख्या ४७ हजारांवर आली.

कुशल कामगांराना रोजगाराच्या संधी व त्याद्वारे उद्योगांना कुशल मुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य शासनामार्फत २००९-२०१० या वर्षांपासून सर्व जिल्ह्य़ांमध्ये रोजगार मेळावे आयोजित केले जातात. या मेळाव्यात विविध उद्योग समूह सहभागी होतात व त्यांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निवडतात. यातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळते. त्यामुळे दरवर्षी अशा मेळाव्यांकडे बेरोजगारांचे लक्ष असते. मात्र, गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात घट झाल्याने त्याचे परिणाम मेळाव्यातून रोजगार प्राप्तीवरही झाल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास खात्याच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

२०१६-१७  मध्ये झालेल्या एकूण २६६ मेळाव्यात १ लाख ९४ हजार ८४४ बेरोजगारांनी नोंदणी केली होती. यापैकी ५१ हजार,७२८ बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. २०१७-१८ मध्ये यात वाढ  होऊन २६४ मेळाव्यांमध्ये नोंदणी केलेल्या १ लाख ६३ हजार, ५०३ तरुणांपैकी ६१ हजार,५२० तरुणांना रोजगार प्राप्ती झाली. मात्र २०१८-१९ मध्ये रोजगार मेळावे आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या रोजगाराच्या संख्येतही घट झाली. या वर्षांत १७१ मेळावे झाले. त्यात नोंदणी केलेल्या १ लाख ६७ हजार ६४१ पैकी केवळ ४७ हजार,४२१ बेरोजगार लोकांनाच काम मिळाले.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजक विकास अभियानातूनही नोंदणीच्या तुलनेत निम्म्याच तरुणांना रोजगाराची संधी मिळाली. २०१६-१७ मध्ये ७७,५६० पैकी ३१,७५८, २०१७-१८ मध्ये ४१,६,७५ पैकी २१०१९, २०१८-१९ मध्ये ३४ हजार ८६० पैकी १०४६ लोकांनाच रोजगार प्राप्त झाला.

बेरोजगारांची संख्या लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यातून प्रशिक्षण घेऊन तरुण बाहेर पडतात. मात्र त्यांच्या हाताला काम मिळणे अवघड झाले आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून २०१८-१९ या वर्षांत २०२८ तर कृषी उद्योगाशी संबंधित प्रकल्पांसाठी ३३,९५९ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला आहे.ह्ण

राज्यातील १ लाख ३५ हजार उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे लाखो कुशल कामगार आधीच बेरोजगार झाले आहेत. नवीन उद्योग येत नाही. त्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही. राज्य शासनाने मागील पाच वर्षांत किती उद्योग सुरू झाले व किती रोजगार निर्मिती झाली, हे प्रथम जाहीर करावे. रोजगार मेळाव्यातून निवड झालेल्या बेरोजगारांना अत्यल्प वेतन दिले जाते व काही वर्षांनंतर त्याला कामावरून काढले जाते. ही बेरोजगारांची थट्टा आहे.

– विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते.