माजी प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांची टीका; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : विद्यापीठामध्ये राजकारण आधीही होते, आजही आहे. कुलगुरूंची नियुक्तीही त्यातून सुटलेली नाही. मात्र, कुलगुरूपदी माझी निवड झाली नाही म्हणून नियुक्तीवर उलटसुलट आरोप करावे, या मानसिकतेचा मी मुळीच नाही. मात्र, कुलगुरू निवड समितीची प्रक्रिया  आदर्शवादी नसल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. एका विद्यापीठात कुलगुरूसाठी अर्ज केला असता पहिल्या पाचमध्ये निवड होते, तर दुसरीकडे पहिल्या ३० मध्येही तुम्ही येत नाही. हा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे एकच कायदा असतानाही समिती कुठले निकष लावते हा संशोधनाचा विषय आहे, अशी टीका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू व अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक देशपांडे यांनी केली.

अर्थशास्त्र विभाग, व्यवसाय व्यवस्थापन विभाग आणि विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसह प्र-कुलगुरू, कुलसचिव, प्रभारी कुलगुरू अशा सर्वोच्च पदांवरील ३६ वर्षांच्या सेवेनंतर डॉ. विनायक देशपांडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांनी विद्यापीठातील अनेक अनुभव सांगितले डॉ. देशपांडे म्हणाले,  कुलगुरू नियुक्त्यांमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. आधी सेवाज्येष्ठ प्राचार्यांच्या थेट मुलाखती घेत त्यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती केली जात होती. त्यानंतर कायद्यात बदल करून अर्ज प्रक्रिया आणि निवड समिती आली. मात्र, या निवड समितीच्या आदर्श प्रणालीवर अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. मुळात प्रादेशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड करताना या विद्यापीठांचा अभ्यास असणारी व्यक्ती  समितीमध्ये असणे अपेक्षित असते. मात्र, त्यात निवृत्त न्यायाधीश, आयआयटी किंवा केंद्रीय संस्थेचे संचालक किंवा प्राध्यापक नेमले जातात. विद्यापीठातील सर्वोच्च अशा कुलगुरू पदाची निवड ही एका आदर्श रचनेतून होणे आवश्यक आहे. आज करोनामुळे शिक्षण क्षेत्र ऑनलाईन झाल्याने विद्यापीठानेही तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. संशोधनाचे वाढते प्रमाण योग्य असले तरी ते प्रादेशिक विकासासाठी आणि समाजोपयोगी हवे, असा सल्लाही त्यांनी दिला. भविष्यात काही पुस्तकांच्या लिखाणाचा संकल्प केल्याचेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

विद्यापीठाने संस्कृती जोपासायला हवी

मी विद्यापीठाबाबत कृतज्ञ आहे. संपूर्ण आयुष्यच इथे गेल्याने एक कुटुंब तयार झाले. कॅम्पसच्या पायाभरणीपासून ते सुवर्ण आणि हिरक महोत्सवाचा साक्षीदार ठरलो. सर्वच प्राधिकरण आणि पदांवर काम केल्याने वाद-प्रतिवाद बघता आले आणि शिकायलाही मिळाले. आधी सगळ्याच विचारधारेच्या मंडळींची व्याख्याने विद्यापीठात होत. त्यातून कायम बोध घेता यायचा. नागपूर विद्यापीठाने या शंभर वर्षांत आपली एक वेगळी संस्कृती निर्माण केली आहे. मात्र, हल्ली ही संस्कृती न जोपासता इतरांशी तुलना अधिक केली जाते. इतर विद्यापीठांशी तुलना हवीच. मात्र, त्यासोबतच आपली संस्कृती कशी जपता येईल, आपल्या संस्कृतीची वाढ कशी होईल, आपले वेगळेपण कशात आहे हे शोधायला हवे, असेही डॉ. देशपांडे म्हणाले.

प्राधिकरणांमधील ‘लोकशाही’ कमकुवत

आधीच्या प्राधिकरणांमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या अधिक असायची. मात्र, नव्या कायद्यानुसार नामनिर्देशित सदस्यच अधिक असतात.  निवडून येणारे सदस्य हे त्या क्षेत्रातील मतदारांना जबाबदार असल्याने अधिक जागृत असतात. ही गोष्ट नामनिर्देशित सदस्यांमध्ये दिसत नसल्याने प्राधिकरणांमधली लोकशाही काहीशी कमकुवत झाली आहे, याकडेही डॉ. देशपांडे यांली लक्ष वेधले.

संघटना नव्हे, विद्यापीठाविषयी आस्था हवी

कुलगुरू पदावर येणारी व्यक्ती ही कुठल्याही संघटनेची असली तरी कुलगुरू झाल्यावर त्यांनी संघटनेचे नाही विद्यापीठाचे काम करणे अपेक्षित आहे. आपल्याला संघटना नाही तर विद्यापीठ मोठे करायचे आहे, त्याविषयी आपली आस्था अधिक असावी असे डॉ. देशपांडे म्हणाले.