प्रदूषण वाढवणारी जुनी वाहने मोडित काढण्यापेक्षा याच वाहनांच्या इंजिन व इतर सुट्या भागापासून बॅटरीवर धावणाऱ्या आगळ्या वेगळ्या ई-बाईकची निर्मिती नागपूरच्या दोन तरुणांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी १५ वर्षे जुन्या वाहनांना मोडित काढण्याचे धोरण आणले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दोन तरुणांनी जुन्या वाहनांच्याच सुट्या भागाचा वापर  करून नवी ई-बाईक तयार के ली आहे. यामुळे पर्यावरणाला फायदा होणारच आहे, दुसरीकडे वाहने मोडित काढल्याने निर्माण होणारा कचराही टळणार आहे. अभिजित खडाखडी आणि शुभम कनिरे अशी या दोन तरुणांची नावे आहेत. अभिजित ने बीएस्सी( कॉम्प्युटर सायन्स) केले आहे तर शुभम हा केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. अभिजितने यापूर्वी इलेक्ट्रिक कारची यशस्वीपणे निर्मिती केली होती. आता त्याने सहकाऱ्याच्या मदतीने बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार केली आहे.

अशी सुचली संकल्पना

जुन्या, मोडकळीस आलेल्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १५ वर्षांपूर्वीची सर्व जुनी वाहने मोडित काढण्याचे नवे धोरण तयार केले आहे. या निर्णयामुळे प्रदूषणात घट निश्चित होईल. पण मोडित निघणाऱ्या वाहनांच्या कचऱ्याचे काय, हा प्रश्न उरतो. त्यावर पर्याय म्हणून जुन्या गाड्यांचे इंजिन व इतर सुट्या भागांचा वापर करून नवे पर्यावरण पूरक वाहन निर्मिती केल्यास हा प्रश्न सुटू शकतो, असे वाटल्याने या दोन्ही तरुणांनी प्रयत्न सुरू केले आणि पंधरा दिवसात कल्पनेला मूर्तरूप दिले.

अशी तयार झाली ई-बाईक

१५ वर्षे जुन्या किंवा वापरात नसलेल्या दुचाकीचे  इंजिन काढून त्याच जागी  बॅटरीवर धावणाऱ्या गाडीसाठी लागणारी यंत्रसामग्री (किट) लावली जाते. गाडीची बॅटरी चार्ज करण्यास चार तास लागतात. १४ रुपये ९२ पैशात ती ११० किमी धावते. ताशी ९० किलोमीटर  वेगमर्यादा असून तिची भारवहन क्षमताही इतर वाहनांपेक्षा अधिक आहे. आज पेट्रोलचे भाव १०० रुपयांपर्यंत  पोहोचले आहेत. सर्वसामान्यांना इतके महागडे इंधन खरेदी करण अवघड होत आहे. या पार्श्वभूमीवर ई-बाईक हा पर्याय स्वस्त आहे, असे असे अभिजित खडाखडी याने सांगितले.