X
X

भंगार साहित्यातून उभारले आगळेवेगळे उपाहारगृह!

READ IN APP

मद्याच्या रिकाम्या बाटल्यांसह बिनकामाच्या कुलपाची सुंदर देखणी चाबीही लक्ष वेधून घेते.

आर्किटेक्ट शिक्षकाची अनोखी ‘द ब्रेकफास्ट स्टोरी’

महेश बोकडे, नागपूर

उपराजधानीतील प्रियदर्शनी कॉलेज आणि एलएडी महाविद्यालयात आर्किटेक्ट शाखेच्या हजारो विद्यार्थ्यांना वास्तू विशारद शिकवणाऱ्या ज्येष्ठ शिक्षक प्रा. मुकुल कुलकर्णी यांनी भंगारातील टाकाऊ साहित्यातून आगळे- वेगळे ‘द ब्रेकफास्ट स्टोरी’ हे रेस्टॉरेन्ट स्वत:च्या घरातच उभारले आहे. येथील ४० देशांतील जुनी नाणी वर्तमानपत्रांचे मुखपृष्ठ, रेडिओ, कॅमेरा व इतर वस्तूंचा संग्रह सर्वाचे लक्ष वेधून घेतो. येथील लहान वाचनालयात चहाचे पिताना काही जण वाचन संस्कृतीही जोपासताना दिसतात.

सर्वाच्या मनात त्यांच्या घरातील टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी? हा प्रश्न घोंगावत असतो. या वस्तू कचऱ्यात टाकल्यावर त्याची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडते. आजही यासंदर्भात शासनाला उत्तर सापडले नाही. परंतु प्रा. मुकुल कुलकर्णी यांनी त्यावर नाविन्यपूर्ण प्रयोग केला. भंगारातील टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी घरातच ‘द ब्रेकफास्ट स्टोरी’ हे न्याहारीचे रेस्टॉरेन्ट उभारले. नागपुरातील एम्प्रेस मॉलपुढे गेल्या अनेक वर्षांपासून चोर बाजार किंवा शनिवार बाजार भरतो. येथे टाकाऊ व जुन्या वस्तू मिळतात.

कुलकर्णी यांनी तेथून जुने तुटक्या- फुटक्या टाकाऊ लाकडांसह अनेक वस्तू अल्पदरात खरेदी केल्या. त्याला फर्निचरसह विविध आकार देत रंग न देता पॉलिश करून नैसर्गिक रंगात रेस्टॉरेन्टचे फर्निचर उभारले. सुंदर फर्निचर असलेल्या टेबलांवर काच ठेवण्यापूर्वी त्याखाली विविध चित्रांची सजावट करण्यात आली. मद्याच्या रिकाम्या बाटल्यांसह बिनकामाच्या कुलपाची सुंदर देखणी चाबीही लक्ष वेधून घेते. कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी जगाच्या विविध देशात भ्रमंती करताना छंद म्हणून जोपासलेल्या खेळण्यातील कार, सुमारे ४० देशातील चलनी नाण्यांसह नोटा, ४५ देशातील वर्तमानपत्रांचे मुखपृष्ठ गो  vbhvgTF  केले. ते रेस्टॉरेन्टमध्ये विविध दर्शनीय ठिकाणी लावले. येथील पुस्तकांचा संग्रह ठेवत छोटेखानी वाचनालय तयार करण्यात आले आहे. दुपारी काही जण येथे पुस्तके वाचत चहा, कॉफीचा आस्वाद घेताना दिसतात.

ऑडिओ कॅसेटने सजवले पिल्लर

आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जुने रेडिओ, टेप रेकॉर्डर, म्युझिक सिस्टिम, मोबाईल, ऑडिओ कॅसेट, टीव्हीचे रिमोट हे कालबाह्य़ झाले आहे. त्याचे आता काहीच काम नाही. परंतु डिजिटल क्रांतीच्या काळात जुन्या साहित्यांची माहिती सामान्यांना मिळावी म्हणून या वस्तूंचा संग्रह या रेस्टॉरेन्टमध्ये दर्शनीय भागात खांबावर लावण्यात आला आहे.

चिमुकल्यांच्या कलेचे सादरीकरण

रेस्टॉरेन्टमध्ये येणाऱ्या कुटुंबात कुणी लहान मुले असल्यास त्यांना येथे कोरा कागद, पेन्सिल, रंग उपलब्ध करून दिले जातात. मुलाने काहीही चित्र त्यावर रेखाटल्यास ते येथील दर्शनीय भागातील फलकावर प्रदर्शित केले जाते. त्यातून या चिमुकल्यांच्या कलागुणांनाही वाव मिळण्यास मदत होते.

अमेरिकेसह चार देशांतील पदार्थ

शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारचे खाद्यपदार्थ मिळणाऱ्या या रेस्टॉरेन्टमध्ये भारतासह अमेरिकन, बेल्जियम, इंग्लंड या चार देशातील न्याहारीचे पदार्थही उपलब्ध करण्यात आला आहे. त्यात सुमारे १०० वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा सहभाग असला तरी त्यातील सुमारे ६० टक्के पदार्थ अंडय़ापासून निर्मित आहेत.

‘‘ खाद्यपदार्थ तयार करण्याचा छंद जोपासण्यासाठी घरातच ‘ब्रेकफास्ट स्टोरी’ सुरू केले. वेगळेपण जपण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करून सजावट केली. त्यात खुद्द ग्राहकांसह नागरिकांनी मदत करत त्या आणूनही दिल्या. येथे खुले स्वयंपाकगृह असून विविध प्रांतातील  गृहिणींच्या खाद्यपदार्थ स्पर्धा अनेकदा घेतल्या जातात. त्यांचा आस्वाद ग्राहकही घेतात.’’

– प्रा. मुकुल कुलकर्णी, द ब्रेकफास्ट  स्टोरी, नागपूर.

22
X