तपास अधिकारी सुहास बावचे यांनी उलगडला तपासणीचा इतिहास

नक्षलवादी चळवळीचा नेता प्रा.जी.एन. साईबाबा याला दिल्ली येथून अटक करून गडचिरोलीत आणणे ही अतिशय रंजक आणि रोमांचक घटना आहे. प्रा. साईबाबाच्या गाडीला दिल्लीतील एका चौकात घेराव घालून अटक केली. दिल्लीतील डाव्या विचारणीच्या लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन दंगल घडू नये म्हणून दिल्ली पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडोर तयार करून दिल्ली विमानतळावर पोलीस पोहोचले. पाच मिनिटे उशीर झाला असता तर कदाचित संपूर्ण दिल्ली पेटली असती.

प्रा. साईबाबा आणि त्याच्या पाच साथीदारांना गडचिरोली प्रधान सत्र न्यायाधीशांनी देशविघातक कृत्य करणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या प्रकरणात दोषी धरून शिक्षा ठोठावल्यानंतर प्रकरणाचे तपास अधिकारी व तत्कालिन अहेरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास बावचे यांनी या प्रकरणातील अनेक घडामोडींवरचा पडदा ‘लोकसत्ता’शी बातचित करताना उलगडला.

२८ ऑगस्ट २०१३ ला अहेरीच्या बसस्थानकावर तिघे संशयास्पद सापडले. त्यांची चौकशी केली असता हेम मिश्रा नावाच्या युवकाकडे एक १६ जीबीचा पेनड्राईव्ह सापडला. यात भूमिगत नक्षलवादी जद्दू आणि प्रकाश यांच्या नावाने अनेक दस्तावेज होते. त्यानंतर ते पेनड्राईव्ह न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले असता पासवर्डने संरक्षित केलेले अनेक दस्तावेज उघडले आणि त्यातून आरोपींचा नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचे उघड झाले. यावेळेपर्यंत प्रा. साईबाबाची माहितीही पोलिसांना नव्हती. परंतु या तिघांना अटक केल्यानंतर काही दिवसांनीच प्रशांत राही याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडूनही बरेच दस्तावेज सापडले. हेम मिश्रा हा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी, तर राही हा महेश या बनावट नावाने उत्तराखंडमध्ये नक्षली कारवायात सहभागी होता, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली. दोघांच्या मोबाइल क्रमांकाचे सीडीआर रिपोर्ट बघितले असता दिल्ली विद्यापीठ परिसरातील प्रा.जी.एन. साईबाबाच्या घराचे शेवटचे लोकेशन मिळाले. त्यांनीही आपल्या बयाणात गडचिरोलीतील जंगलात जहाल नक्षलवादी नर्मदाक्का हिला आणि रामदार यांना भेटण्यासाठी पाठविले होते. शिवाय, त्यापूर्वी मे २०१३ मध्ये दोन युवकांनी नर्मदाक्काकडून ५ लाख रुपये प्रा. साईबाबाला पोहोचविल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर गडचिरोली-गोंदिया नक्षल परिक्षेत्राचे तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम व अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली १२ सप्टेंबर २०१३ ला न्यायालयातून परवानगी घेऊन प्रा. साईबाबा याच्या दिल्लीतील घराची झडती घेतल्यावर त्याच्या घरातून कॉम्प्युटर हार्डडिस्क, इतर लिखित साहित्य जप्त करण्यात आले. यातून आणि हार्डडिस्कमधील व्हिडिओ रेकॉर्डिगवरून प्रा. साईबाबा हा नक्षलवाद्यांची केंद्रीय समिती आणि चीन, नेपाळ, भूटान, बांगलादेश आदी देशांमधून भारतातील नक्षलवादाला मदत मिळविण्यासाठी कार्य करीत होता. याच उद्देशाने केंद्रीय समितीने १९९६ मध्ये त्याला दिल्लीत स्थायीक होण्याचे आदेश दिले होते. १९९९ पासून दिल्ली विद्यापीठात कार्यरत होऊन तो नक्षलवादी चळवळीचा शहरी भागात प्रसार व प्रचार करू लागला. त्यासाठी दिल्लीतील कम्युनिस्ट नेत्यांची मदत घ्यायचा. याशिवाय, देशातील माओवादी चळवळीला समर्थन मिळविण्यासाठी काश्मिरमधील फुटीरवाद्यांचे समर्थन करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करून माओवादी चळचळीसाठी सहकार्य मिळवित होता, हे दस्तावेज अत्यंत महत्वाचे होते. सर्व दस्तावेज जप्त करण्यात आले. त्यांचा अभ्यास करण्यात आला आणि सर्व पुराव्यानिशी आठ महिन्यांनी म्हणजे, ९ मे २०१४ ला दिल्लीत अटक करण्यासाठी गेलो. त्यावेळी सोबत अतिरिक्त अधीक्षक शशीकुमार मीना आणि इतर चार अधिकारी होते. दिल्ली पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात आली होती.

सकाळपासून प्रा. साईबाबाचे दिल्लीतील लोकेशन मिळविले. त्यावेळी तो घरी नव्हता, तर दिल्ली विद्यापीठातील घरापासून काही अंतरावर पेपर तपासायला गेला होता. पेपर तपासण्याचे ठिकाण ते त्याचे घर अगदी दोन कि.मी. अंतरावर होते. शिवाय, त्याला अटक करण्याची माहिती लोकांना मिळाल्यास दिल्ली पेटण्याची शक्यता होती. त्यामुळे अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. पेपर तपासणी केंद्रातून प्रा. साईबाबा बाहेर पडताच त्याला एका चौकात चारही बाजूने पोलीस गाडय़ांनी घेरले. त्याच्या वाहनचालकाला ताब्यात घेऊन प्रा. साईबाबाला पोलीस वाहनात बसविण्यात आले आणि पूर्वी ठरल्याप्रमाणे त्याच्या घराजवळचे पोलीस ठाणे सोडून दहा कि.मी.वरील दुसऱ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे पाच मिनिटात त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करून दूरध्वनीवरून त्याची पत्नी वासंता हिला माहिती देण्यात आली. दिल्ली पोलिसांनी विमानतळावर पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करून दिले आणि दीड तासांचा रस्ता अध्र्या तासात पूर्ण करून विमानतळ गाठले. विमानतळात शिरून पाच मिनिटे होत नाही, तर विमानतळाबाहेर सुमारे हजारो लोकांचा जमाव गोळा झाला होता. उशीर झाला असता तर कदाचित दिल्लीतून बाहेर पडणेच गडचिरोली पोलिसांना अशक्य झाले असते. रात्री ९ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळ गाठून तेथून हजारो पोलीस व राज्य राखीव पोलीस बलाच्या सुरक्षेच्या सैनिकांच्या बंदोबस्तात रात्री २ वाजता अहेरी पोलीस ठाण्यात पोहोचलो. हा प्रवास अतिशय रोमांचक वाटत असला तरी पावलोपावली प्रचंड आव्हान होते, असेही सुहास बावचे म्हणाले.

तीन वेगवेगळ्या विमानांचे तिकिट

प्रा. साईबाबाला आपण कोणत्या क्षणी अटक करू, हे कुणालाच माहिती नव्हते. शिवाय, दिल्लीच्या वातावरणात त्याला अटक करून तेथेच ठेवणे अशक्यप्राय गोष्ट होती. त्याला अटक केल्याची माहिती बाहेर गेल्यानंतर क्षणात हजारो लोक रस्त्यावर उतरतील आणि संपूर्ण देशात हाहाकार होईल, याची कल्पना होती. त्यामुळे त्याला अटक केल्यावर ताबडतोब दिल्लीबाहेर काढण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. त्यामुळे वेळ निश्चित नसल्याने एका दिवसातील तीन विमानांचे तिकिट बुकिंग करून ठेवण्यात आले. शिवाय, आरोपीला विमानातून हलविणे अतिशय जिकरीचे असल्याने आधीच काळजी घेण्यात आली होती, असाही उलगडा त्यांनी केला.