सुरेश तापस यांच्या बेपत्ता होण्याने शिक्षण क्षेत्रही स्तब्ध

आपल्या अभ्यासपूर्ण अध्यापनातून गुणवंत विद्यार्थी घडवणारे आणि प्रामाणिक प्रशासनातून विविध महाविद्यालयांना दिशा देणारे निवृत्त प्राचार्य सुरेश तापस हे अचानक कुठेतरी निघून गेल्याने त्यांच्या विद्यार्थी वर्गाला मोठा धक्का बसला आहे. तापस यांच्या प्रशासनिक कौशल्याची जाण असलेल्या शिक्षण क्षेत्रालाही त्यांच्या या कृतीने स्तब्ध केले आहे.

नागपुरात राहणारे निवृत्त प्राचार्य सुरेश रामभाऊ तापस (७६) हे १६ जूनच्या सकाळपासून अमरावतीतून बेपत्ता झालेत. १६ जूनला ते सकाळी ८.३० वाजता तळेगाव दशासर येथून एसटी बसने अमरावतीला आले होते. येथून त्यांनी नागपुरातील आपल्या शेजाऱ्याला फोन करून ११.३०पर्यंत तिकडे पोहोचत असल्याचे कळवले, परंतु नागपुरात काही पोहोचले नाहीत. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अमरावतीतील रुख्मिणी नगरात दाखवत होते. निवृत्ती वेतनाच्या विषयावरून ते तणावात होते आणि त्यातूनच ते कुठेतरी निघून गेले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे, परंतु तापस यांना जवळून ओळखणारे त्यांचे स्नेही आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना ही बाब पचवणे कठीण जात आहे. कारण, सुरेश तापस हे कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. अनेक मोठी संकटे त्यांनी त्यांच्या आयुष्यात पचवली होती. अत्यंत अभ्यासू, प्रगल्भ आणि संयमी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले तापस असा काही अविवेकी निर्णय घेतील, यावर कुणाचाच विश्वास नाही, परंतु तब्बल १२ दिवसानंतरही त्यांचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने सारेच अस्वस्थ आहेत. विशेषत: त्यांच्या अध्यापनाचे सौभाग्य ज्यांना लाभले ते विद्यार्थी त्यांच्या बेपत्ता होण्याची बातमी कळली तेव्हापासून चिंतेत आहेत. तापस यांनी अध्यापन कार्याच्या अगदी सुरुवातीला धरमपेठ महाविद्यालयात नोकरी केली. त्यानंतर ते कामठीच्या पोरवाल कॉलेजचे प्राचार्य झाले व तिथून कुही तालुक्यातील मांढळ येथील श्री लेमदेव पाटील कला महाविद्यालयात ७ वष्रे प्राचार्यपदाची सेवा देऊन निवृत्त झाले. या संस्थांमध्ये त्यांचा कार्यकाळ अतिशय आदर्शवत असा राहिला. त्यामुळे येथील सर्वच मंडळी त्यांच्या सुखरूप परत येण्यासाठी कामना करीत आहेत.

आणीबाणी पाहिली, कारागृहही भोगले

सुरेश तापस हे तरुण असताना संघाचे प्रचारक होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली तेव्हा संघाच्या इतर स्वयंसेवकांप्रमाणे त्यांनीही आणीबाणीला कडाडून विरोध केला. या विरोधामुळे कारागृहही भोगले, परंतु तत्त्वांशी तडजोड केली नाही. आपल्या वैचारिक निर्धारावर कायम राहिले. इतक्या कणखर वृत्तीचा माणूस इतक्या शूद्र कारणावरून निराश होईल, यावर म्हणूनच त्यांच्या हितचिंतकांचा विश्वास बसत नाही.

तापस यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली आहे. आम्ही त्यांच्या शोधासाठी विशेष पथके गठित केली आहेत. देशभरातील पोलिसांना कळवण्यात आले आहे. विविध शहरांमध्ये त्यांच्या छायाचित्रासह शोधपत्रिका लावण्यात आल्या  आहेत, परंतु आज १२  दिवस झाले त्यांचा कुठेच पत्ता नाही. आम्ही आशावादी असून ते लवकर सापडावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. – शरद कुलकर्णी,  पोलीस निरीक्षक, अमरावती