व्हीएनआयटीचा नव्या योजनेवर विचार

उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी विविध बांधकाम प्रकल्पांसाठी सल्लागार (कन्सलटन्ट) म्हणून सेवा देऊन संस्थेच्या उत्पन्नात भर घालण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले असले तरी, या कामासाठी प्राध्यापक अनुत्सुक आहेत. त्यामुळे व्हीएनआयटी एका नवीन योजनेवर विचार करत असून त्याअंर्तगत कंत्राटी पद्धतीने सचिव नियुक्त करण्यात येणार आहे.

नागपुरातील व्हीएनआयटीकडे सल्लागार म्हणून सेवा देण्याची सध्या ४ कोटी रुपयांची कामे आहेत. ‘अप्लाईड मेकॅनिकल’, स्थापत्य अभियांत्रिकी तसेच इतर काही विभागाकडे ही कामे आहेत. प्राध्यापकांच्या माध्यमातून हे काम केले जाते.

त्यासाठी त्यांना मोबदला मिळतो. मात्र, हे अतिरिक्त काम असल्याने प्राध्यापक ते करण्यास तयार नसतात. संबंधित प्राध्यापकाला त्यांचे संशोधन, प्रकल्प अहवाल, दैनंदिन वर्ग आदी सर्व कामे सांभाळून सल्लागाराची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे सल्लागारासाठी (कन्सलटन्सीसाठी) प्राध्यापक उपलब्ध होत नाहीत.

यातून मार्ग काढण्यासाठी व्हीएनआटी एका नवीन योजनेवर विचार करत आहेत. या कामासाठी कंत्राटी पद्धतीवर सचिन नियुक्त करण्यात येणार आहे. ही नियुक्ती ८९ दिवसांकरिता राहणार आहे.

सचिव संस्थेची प्रयोगशाळा वापरेल आणि त्याला कन्सलटन्सीमधून मिळालेल्या रकमेतून वेतन दिले जाईल. सल्लागार शुल्काच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून व्हीएनआयटीतील प्रयोगशाळांमधील उपकरण खरेदी करणे तसेच इतर पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. सध्या या प्राप्त रकमेतील ५० टक्के रक्कम संस्थेला, तर २५ ते ३० टक्केरक्कम संबंधित प्राध्यापकाला दिली जाते.

व्हीएनआयटी नागपूर मेट्रो रेल्वे, सिमेंट रस्ते तसेच महापालिका बांधत असलेल्या पुलांसाठी सल्लागार म्हणून काम करीत आहे. व्हीएनआयटीकडे असलेले काम दोन आठवडे, चार आठवडे किंवा एक महिना, दोन महिने अशा कालावधींसाठी आहे. जास्तीत जास्त कामे घेण्याचे दडपण संस्थेवर आहे.

त्यातल्या त्यात नागपुरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्याच्या ‘काँक्रिट मिक्स डिझाईन’चे काम व्हीएनआयटीकडे आहे.

रस्त्यांना भेगा गेल्या आहेत. रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम होण्यापूर्वी गिट्टी, सिमेंट, रेती आदीप्रमाणे त्याचे योग्य मिश्रण आदी बाबी तपासून घेणे आवश्यक होते, परंतु यात त्रुटी राहिल्याने हा प्रकार घडला. यावर तोडगा काढत कंत्राटी पद्धतीने सचिव नियुक्त करण्याचा प्रस्ताव व्हीएनआयटीने तयार केला आहे.

सल्लागार होण्यास प्राध्यापक तयार नसतात. त्यामुळे यासाठी सचिवांची नियुक्ती करण्याच्या पर्याय आहे. ही नियुक्ती ८९ दिवसांची राहील. 

डॉ. नरेंद्र चौधरी, संचालक, व्हीएनआयटी.