नागपूर : गुणांचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीशी कारमध्ये अश्लील चाळे करणारा विमेन्स कॉलेजचा प्राध्यापक फरार झाला आहे. हा प्रकार समोर येताच विमेन्स कॉलेज प्रशासनाने प्राध्यापकाला निलंबित केले.

डिसेंबर २०१९ मध्ये प्रा. वैरागडे हा नंदनवनमधील विमेन्स कॉलेजमध्ये नियमित प्राध्यापक असताना त्याने पीडित विद्यार्थिनीला गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवले. २६ डिसेंबरला संगणकाचा अर्ज करण्याच्या बहाण्याने त्याने विद्यार्थिनीला कारने धरमपेठेत नेले. परतीच्या प्रवासात त्याने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. विद्यार्थिनीने विरोध केला असता याबाबत कोणाला सांगितले तर तुला ठार मारेल, तुझे करिअर संपवून टाकेल, अशी धमकी त्याने दिली. यामुळे विद्यार्थिनीने याबाबत कोणालाही सांगितले नाही. काही दिवसांपूर्वी वैरागडे पुन्हा या विद्यार्थिनीशी संपर्क साधायला लागला. त्यामुळे विद्यार्थिनीने नंदनवन पोलीस ठाणे गाठून थेट तक्रार दिली. पोलिसांनी वैरागडेवर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर अटकेसाठी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. आरोपी फरार आहे.

महाविद्यालयाच्या नावाची गल्लत

प्रा. दिलीप वैरागडे हा ‘विमेन्स कॉलेज’मध्ये कार्यरत असून गुरुवारच्या अंकात अनावधानाने ‘महिला महाविद्यालय’ असे प्रसिद्ध झाले होते. पण, नंदनवनमधील ‘महिला महाविद्यालय’ व ‘विमेन्स कॉलेज’ ही दोन वेगवेगळी महाविद्यालये असून त्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. आरोपी प्राध्यापक हा ‘विमेन्स महाविद्यालयात’ अधिव्याख्याता आहे. त्याला निलंबित करण्यात आले आहे. शिवाय त्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर काम केले आहे.