संस्कृत विद्यापीठात गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ

संस्कृत भाषेला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून जर्मन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी प्रमुख विद्यापीठामध्ये या भाषेचा अभ्यास केला जात आहे. संस्कृत विद्यापीठाने जगातील विद्यापीठांसोबत समन्वय साधून संस्कृत अध्ययनासोबत संशोधनाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ तसेच नवीन शैक्षणिक  भवनाचे लोकार्पण, गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे अनावरण व शारदापीठ शिलान्यासाचे अनावरण  राज्यपालांच्या हस्ते झाले यावेळी पेजावरमठाधिपती श्रीविश्वेशतीर्थ श्रीपाद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मल्लिकार्जून रेड्डी, आमदार गिरीश व्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी  जोशी, कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, भारतीय प्राच्यविद्येचा अभ्यास व या विषयातील विविध शाखांमध्ये मोठय़ा प्रमाणांवर मूलभूत संशोधन होत आहे. जर्मनी व अमेरिका हे देश यामध्ये अग्रेसर आहेत. भास्कराचार्य यांनी अनेक शतकाआधी अचूक गणना करत पृथ्वीची गती सांगितली होती. त्यांनी ती अचूक गणना कशी केली असेल याचे संशोधन संस्कृत विद्यापीठाने करायला हवे, असेही राज्यपाल म्हणाले.

देशाला अधिक प्रमाणात बौद्धिक व ज्ञान आधारित मंडळांची गरज आहे. आज जगात आपल्या देशाला स्वीकारले जात आहे. २०१४ नंतर या परिवर्तनाला गती प्राप्त झाली आहे. मात्र, भविष्यात भारताला गौरवाचे स्थान प्राप्त करण्यासाठी आणखी ज्ञानी लोकांची गरज आहे, असे भय्याजी जोशी म्हणाले.

कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी प्रास्ताविकाद्वारे विद्यापीठ परिसराला गोळवलकर गुरुजी गुरुकुलस्य असे नाव देण्याची घोषणा केली. कालिदासांच्या समग्र वाङ्मयाचा मराठी अनुवाद करण्यात आला असून त्याचे प्रकाशन लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एम. पातूरकर उपस्थित होते.

जि. प. शाळांमध्ये संस्कृत शिकवण्यावर विचार व्हावा – गडकरी

संस्कृत भाषेविषयीचे गैरसमज अभ्यासकांनी दूर करावे. इराण आणि जर्मनीमध्ये  संस्कृतवर अधिक संशोधन होत आहे. नागपूर जिल्ह्यतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासकरून रामटेकच्या जवळपासच्या शाळांमध्ये संस्कृत भाषेचे शिक्षण देता येईल का, याचा विचार केला पाहिजे, असे गडकरी म्हणाले. गंगा शुद्धीकरणासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आतापर्यंत फक्त १५ टक्के काम झाले आहे. तरीही पाणी शुद्ध झाल्याचे कुंभमेळ्याला गेलेले भाविक सांगतात. ऑगस्टपर्यंत  प्रयाग परिसरातील गंगा पूर्ण शुद्ध झालेली असेल, असेही गडकरी म्हणाले.