संपत्तीसाठी मुलाकडून वडिलांचा खून; अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या;  जन्मदात्याने सात वर्षांच्या मुलीला संपवले

नागपूर : आजच्या स्वार्थी युगात नात्यांचे संदर्भच जणू  बदलून गेले आहेत. टोकाची व्यसनाधीनता, संपत्तीचा हव्यास आणि आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संशयातून आपल्याच आप्तस्वकीयांचे जीव घेतले जात आहेत. गुन्हेगारी कृत्यातून नात्यालाच काळिमा फासणाऱ्या तीन घटना लागोपाठ उपराजधानीत घडल्याने समाजमनही हादरून गेले आहे.

पहिल्या घटनेत वडिलोपर्जित संपत्तीसाठी मुलाने वडिलाच्या डोक्यावर सळईने (सब्बल) मारून खून केला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मद अली चौक, भालदारपुरा येथे घडली. शेख युसूफ मेहबूब बसीर (७३, रा. मोहम्मद अली चौक) असे मृताचे तर शेख युनूस शेख युसूफ (५०) असे आरोपीचे नाव आहे.  आरोपी हा फॅब्रीकेशनचे काम करायचा.  त्याला पत्नी व एक मुलगा, मुलगी आहे. चार महिन्यांपासून तो वडिलांसोबत राहात होता. वडील मजुरी करायचे. भालदारपुरा चौकात त्यांचे वडिलेपार्जित घर असून वडिलांनी ते १० लाखात विकले होते. त्या घराच्या संपत्तीत  मुलाला वाटा हवा होता. त्यावरून त्यांच्यात दररोज भांडण सुरू होते. बुधवारी आरोपीने रागात  सळईने वडिलांच्या डोक्यावर मारून खून केला. आरोपी स्वत: गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहोचला व घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेच्या वेळी घरात मृताची पत्नी, आरोपीची पत्नी, त्याची ११ वर्षांची मुलगी व एक मुलगा उपस्थित होते. पोलीस घरी पोहोचले असता सर्वजण रडत होते. पण पोलिसांनी विचारणा केली असता आरोपीच्या ११ वर्षांच्या मुलीने  आपल्यासमोर वडिलांनी आजोबाला मारल्याचे सांगितले.

दुसऱ्या घटनेत  पत्नीचे एकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह जंगलात लपवून  स्वत:च पोलीस ठाण्यात पोहोचून पत्नी हरवल्याची तक्रार दिली. पण, पोलिसांना पतीवरच संशय आल्याने त्यांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत चांदमारी परिसरातील झुडपी जंगलात उघडकीस आली. हंसा युवराज पटले (२८, रा. जिजामातानगर) असे मृत महिलेचे तर  युवराज नेमचंद्र पटले (२८, रा. भिलगाव माजरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व मृत  पत्नी कंत्राटदाराकडे काम करायचे. पत्नीचे बांधकाम कंत्राटदाराशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. तो मद्यप्राशन करून तिला मारहाण करायचा.  २१ फेब्रुवारीला  त्याने पत्नीला फिरायला चल म्हटले. ती त्याच्यासोबत गेली असता  चांदमारी परिसरातील जंगलात तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह कचरा व काठ्यांनी झाकून ठेवला. पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांना त्याची वागणूक संशयास्पद वाटली.  त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता  त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

तिसऱ्या घटनेत पत्नीसोबतच्या भांडणातून जन्मदात्यानेच सात वर्षांच्या मुलीचे अपहरण करून खून केला. ही घटना बेला पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. गजानन मोहन काळे (२८) आणि मोहन सखाराम काळे दोन्ही रा. ढवलपेठ, बुटीबोरी अशी आरोपींची नावे आहेत. बिजली गजानन काळे (७) असे मृत मुलीचे नाव आहे. गजाननला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तो नेहमी पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ती आपल्या मुलीला घेऊन वडिलांकडे राहायला गेली होती.

पत्नीचे वडील व आरोपी एकाच गावात राहतात. २२ फेब्रुवारीला दुपारी बेला येथे त्यांच्या नात्यात एकाचे लग्न होते. त्या लग्नासाठी आरोपी, त्याची पत्नी व मुलगी वेगवेगळे बेल्यात दाखल झाले. लग्न समारंभातून बिजलीला  वडील गजानन व आजोब मोहन यांनी  फूस लावून सोबत घेऊन गेले व तिचा गळा आवळून खून केला. मुलगी दिसत नसल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असता चौकशीअंती वडिलाने तिचा खून केला असून तिचे अपहरण करण्यासाठी आजोबाने मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.