महेश बोकडे

उपराजधानीतील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनाही करोनाने ग्रासले आहे. आजपर्यंत येथे एकूण ४१ बाधित आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने कारागृहातच कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे. याशिवाय मेडिकल, मेयोला वैद्यकीय चमूची मदत मागण्यात आली आहे.

या कारागृहात २८ जूनला एका शिपायाला करोना असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर ३० जूनला एका अधिकाऱ्यासह इतर कर्मचारी अशा एकूण ९ जणांना तर १ जुलैला ४४ जणांना करोना असल्याचे पुढे आले. यात १२ कैदी बाधित आढळले. त्यानंतर २ जुलैला १२ जण, ३ जुलैला ३० जण तर ४ जुलैच्या दुपापर्यंत आणखी सात जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. एकूण बाधितांमध्ये  ४१ कैद्यांचा समावेश असून यापैकी २०  मेयो तर २१ जण मेडिकलच्या कोव्हिड रुग्णालयात दाखल आहेत. सध्या कारागृहात  १,८५० कैदी आहेत.

कारागृह प्रशासनाने येथील तीन बॅरेकमध्ये १५० जणांना विशिष्ट अंतरावर ठेवून उपचार करता येईल अशी सोय केली आहे. येथे संशयितांना विलगीकरणात ठेवले आहे. परंतु येथेच कोव्हिड केअर सेंटर तयार करण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे दिला आहे. येथे एकही लक्षणे नसलेल्यांनाच ठेवले जाईल. त्यांच्यावर कारागृहातील डॉक्टरांकडून उपचार केले जातील. तसेच मेडिकल, मेयो प्रशासनाला तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू दिवसातून एकदा येथे पाठवण्याची विनंती प्रशासनाने केली आहे.

 एक डॉक्टरही बाधित

मध्यवर्ती कारागृहात सध्या तीन डॉक्टर कार्यरत आहेत. यापैकी एका डॉक्टरला विषाणूची बाधा झाल्याने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची

मेडिकल आणि मेयोत प्रथमच मध्यवर्ती कारागृहातील करोनाबाधित कैद्यांना  ठेवण्यात आले आहे. दरम्यान कैद्यांनी पळण्याचा प्रयत्न करण्याची शक्यताही नकारता येत नाही. त्यामुळे दोन्ही रुग्णालय प्रशासनाने खबरदारी घेत सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असल्याचे स्पष्ट पत्र संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहे.

सध्याच्या ४१ बाधित कैद्यांना मेडिकल-मेयोत दाखल केले असून त्यांच्या संपर्कातील काहींना कारागृहातील तीन बॅराकीत विलगीकरणात ठेवले आहे. येथे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यात लक्षणे नसलेल्यांवर मेडिकल, मेयोतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने उपचार करण्याचा प्रयत्न आहे.

– अनुप कुमरे, कारागृह अधीक्षक.