स्पा अ‍ॅण्ड स्किन क्लिनिकच्या नावाखाली हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत शारदा चौकात सुरू असलेल्या आलिशान कुंटणखान्यावर परिमंडळ-४ च्या पोलीस उपायुक्त पथकाने छापा टाकून कारवाई केली. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

शारदा चौकातील मियामी स्पा अ‍ॅण्ड स्किन क्लिनिक अंतर्गत तरुणींकडून देहव्यापार केला जात असल्याच्या माहितीवरून भरणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कोचोरे, बावनकर, शिपाई मनोज, बजरंग, अशोक, सुशांत, सचिन आणि उत्कर्ष राऊत यांनी छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी तीन महिलांकडून देहव्यापार करवून घेताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी रणजित पांडुरंग मस्के (३७) रा. शिवनगर, पुनापूर  मार्ग आणि रवि सुजदास उदयकर (२५) रा. पारडी अशी आरोपींची नावे आहेत. तर पीडित तीन महिलांपैकी एक महिला विवाहित आहे. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने विभक्त राहात असून तिला दोन मुले आहेत. पूर्वी ती रुग्णालयात काम करायची. मात्र, एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिला स्पामध्ये कामावर ठेवण्यात आले. तर इतर दोन तरुणी या मसाज सेंटरमध्ये कामाला होता. काही दिवसांपूर्वी या स्पामध्ये रुजू झाल्या. त्यांच्याकडून त्या ठिकाणी देहव्यापार करवून घेण्यात येत होता.

वेलकम डान्सबारवर  छापा

कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये सुगम संगीतच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्स बारवर गुरुवारी मध्यरात्री परिमंडळ-५चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी कारवाई केली. यात पोलिसांनी बारा जणांना अटक केली असून चार बारबालांची सुटका केली. वेलकाम बारला ऑर्केस्ट्रा परवाना असून त्याची मुदत संपली आहे. शिवाय ग्रामपंचायत क्षेत्रात महामार्गपासून ५०० मीटर अंतरावर असल्याचे बारचा परवानाही रद्द झाला आहे. त्या ठिकाणी अवैधपणे डान्सबार चालत असल्याची गुप्त माहिती बावचे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी गुरुवारी मध्यरात्री १ वाजता वेलकम बारमध्ये कारवाई केली. यावेळी तेथे विना परवाना दारूविक्री केली जात असल्याचे समोर आले. तसेच तेथे चार मुली नाचत असून आठ ग्राहक त्यांच्यावर पैसे उधळत होते. डान्स बारला राज्यात सशर्त परवानगी मिळत असून नागपुरात अद्यापही एकही बारकडे अशी परवानगी नाही. त्यामुळे पोलीस कारवाई दरम्यान येथील आठ ग्राहक, बारचा व्यवस्थापक आणि तीन कर्मचारी अशा बारा जणांना अटक करण्यात आली तर चार मुलींची सुटका करण्यात आली. सिद्धार्थ ब्रिजमोहन पुरोहित (४०) रा. सुरत, राजेंद्र धनराज सातपुते (२८) रा. सद्भावनानगर, रितेश ब्रिजमोहन शर्मा रा. रायपूर, सचिन रामदासराव क्षीरसागर (३४) रा. महाल, राजीव सुंदरलाल सोनसाखरे रा. महाल, पंकज प्रल्हाद गोंडाने (३८) रा. टेका नाका, आसिफ खान मोहम्मद खान (४२) रा. टिमकी, गुलाब ताराचंद रहांगडाले (३२), विक्की सुनील ढोबळे (३०) आणि भूपेंद्र किशोर चंदेल (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा लॉन आणि बार गुप्ता नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल पोलिसांनी करून तपास सुरु केला आहे.