मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

पालकांनी आपल्या मुलांना  लहानपणापासून संवेदना मूल्याधारित, योग्य संस्कार दिले तर विकृतीची मानसिकता बदलणे शक्य होऊ शकते, असे  मत एन.के.पी. साळवे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे सहयोगी प्राध्यापक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते.

डॉ. सुशील गावंडे म्हणाले, हल्ली अनेक कुटुंबात आई-वडील मुलांना जास्त वेळ देत नाहीत, किंवा इच्छा असतानाही देऊ शकत नाही.  मुल रडले तर अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलवर एखादा व्हिडिओ लावून त्याच्या हाती दिला जातो. व्हिडिओ बघून मुले खेळतात. त्यामुळे पालकांना आंशिक दिलासा मिळतो. परंतु मुलांना मोबाईलचे वाईट व्यसन लागते. मोबाईलमुळे मुलांच्या मानसिक अवस्थेवर वाईट परिणाम होतात.  त्यांच्यात हिंसक प्रवृत्ती वाढते. ही मुले मोठी होत असताना यातील काहींना पॉर्नसारखे चुकीचे व्हिडिओ बघण्याची सवय लागते.

देशात काही पॉर्न संकेतस्थळावर सरकारने बंदी घातली आहे. परंतु प्रत्यक्षात हजारो संकेतस्थळ अजूनही सुरू असल्याने मुलांना ते सहज बघता येतात. या पॉर्नची मित्रांमध्येही चर्चा होते. या प्रणयक्रीडेतून  आनंद मिळत असल्याची भावना मुलांमध्ये तयार होते. हळूहळू मुलांत हे व्यसन वाढत जाते व त्यातून बलात्कारासह इतरही गंभीर गुन्हे घडतात.

हे टाळण्यासाठी बालवयापासून प्रत्येक पालकांनी मुलांना योग्य शिकवण द्यायला हवी. त्यात कुणाला मारहाण केल्यास त्याला वेदना होतात, आईला वाईट बोलल्यास तिच्या मनावर  परिणाम होतो, असे सांगायला हवे.  दहा मुले एकत्र असल्यास सगळ्यांमध्ये एक मोठे चॉकलेट समसमान वाटून आनंद व्यक्त करायला शिकवणे, सगळ्यांनी आनंद व्यक्त केल्यावर त्यांना तुम्ही समसमान चॉकलेट वाटल्याने आनंद झाल्याचे त्यांना पटवून देणे गरजेचे आहे. त्यातून मुलांना आदर, अहिंसा, सामंजस्यासह इतर संस्कार मिळतील. मुलांवरील हे संस्कारच पुढच्या पिढीला चांगले व्यक्ती बनवून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्य़ाची प्रवृत्ती संपवू शकतात. सोबतच असे गुन्हे करणाऱ्याला कडक शिक्षा तातडीने होणे गरजेचे आहे.

आर्थिक कमकुवत गटावर विशेष लक्ष हवे

भारतासह इतरही देशातील बलात्काराच्या आरोपींमध्ये सर्वाधिक आरोपी हे आर्थिक कमकुवत गटातील असल्याचे विविध संस्थेच्या निरीक्षणात पुढे आले आहे. त्याचा अभ्यास केला असता आई-वडील दोघेही कामावर गेल्यास मुले नको त्या गोष्टी करायला लागतात. या मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांना चुकीच्या माहितीची जाणीव होऊ शकेल. उच्च व मध्यम गटातील मुलांच्या शाळेत हे शिक्षण दिले जाते. कुठे-कुठे आवश्यकतेहून जास्त शिक्षण दिले जाते. परंतु खऱ्या अर्थाने या शिक्षणासाठी आर्थिक कमकुवत गटावर जास्त लक्ष द्यायला हवे असे ते म्हणाले.

अमेरिकेत दोन वर्षांपर्यंतच्या मुलांपासून मोबाईल लांबच

अमेरिकन पेडियाट्रिक अ‍ॅकेडमीनुसार, जन्मानंतर बालकांचे वय दोन वर्षांचे होईपर्यंत त्यांचा मेंदू सर्वाधिक विकसित होतो. या वयात अमेरिकेत मुलांना मोबाईलचे स्क्रिनही दाखवले जात नाही. मोबाईल दाखवल्यास मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. दोन ते नऊ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोबाईलवर  कविता, मैत्रीपूर्ण कार्टुन थोडा वेळ दाखवता येते. परंतु त्यात मारहाण, उत्तेजणांचा समावेश नको. हे व्हिडिओ पालकांनी सोबत बघितल्यास चांगले आहे. मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांना व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक खाते त्यांना विचारल्याशिवाय न उघडण्याची जाणीव करून देणे, अनोळखी व्यक्तींची फ्रेंडरिक्वेस्ट न स्वीकारणे व त्याची हानीही समजावून सांगण्याची गरज डॉ. गावंडे यांनी विशद केली.

पाच पीडितांपैकी एक गुन्हेगार

केंद्रातील एका संस्थेच्या अहवालानुसार, देशात वर्ष २०१३ मध्ये २४ हजार ९२३ बलात्काराच्या एकूण घटना घडल्या. त्यातील ९८ टक्के म्हणजे २४ हजार ४७० प्रकरणातील आरोपी हे नातेसंबंध किंवा परिचितांपैकी होते. बालवयात लैंगिक अत्याचार होणाऱ्या पाचपैकी एक मुलगा मोठा झाल्यावर इतरांवरही लैंगिक अत्याचार करत असल्याचेही पुढे आल्याचे डॉ. गावंडे यांनी सांगितले.