मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात गेल्या काही दिवसांपासून ‘सायको किलर’ने सहा महिलांवर चाकूसदृष्य शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केले. या आरोपीला अद्याप पोलिसांकडून अटक झाली नसल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शहरात महिला एकटय़ा फिरायला घाबरत असून रविवारीही एका महिलेवर नालंदानगरमध्ये हल्ला झाला. हा हल्ला सायको किलरने केला की इतर कुणी, हे स्पष्ट झालेले नाही. सायको किलरची दहशत खरी किती आणि खोटी किती?  हे गूढच आहे.

उपराजधानीतील सक्करदरा, अजनी आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत गेल्या काही दिवसांत सुमारे सहा महिलांवर चाकूसदृश्य शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्याच्या मागणीकरिता सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घालत नागरिकांनी आंदोलनही केले. या घटनेमुळे शहरात सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरली आहे. अनेक भागात नागरिकांनी महिलांसह तरुणींना एकटे फिरण्यास कुटुंबीयांकडून मज्जावही केल्याचे दिसत आहे. रविवारी दुपारी अजनी हद्दीतील नालंदानगरात  एक ३८ वर्षीय महिला नेहमीप्रमाणे काम करत असलेल्या वकिलाकडून कैलासनगराकडे पायदळ घरी निघाली. रस्त्यावर अचानक एका आरोपीने तिच्यावर हल्ला केला. महिलेला चाकू दाखवल्या गेला.

महिलेने आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी तिच्याकडे धाव घेतल्याने आरोपी पसार झाला. महिलेच्या मनगटावर जखम झाल्याने हे कृत्य सायकोचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली.

महिलेच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक पाटील यांनी या प्रकरणात एका मोटारसायकलस्वार चालकाने महिलेचे काही कारणास्तव मनगट पकडले असून त्या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. या प्रकारात शहरात घडणाऱ्या सायकोच्या घटनेशी संबंध नसल्याचे ते म्हणाले.

नागपुरात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांसह नागपूर महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अद्याप पोलिसांना सायको किलर आरोपीला पकडता येत नसल्याने येथील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.

शहरातील घटना

* स्नेहलता नागरमोते-रेशीमबाग ल्ल प्रेमलता भोयर -नवीन बिडीपेठ

* मनोरमा गोडबोले-खानकोजेनगर ल्ल जुई हेडाऊ-दत्तात्रयनगर

* शोभा ठाकूर -हनुमाननगर ल्ल चंद्रकला ढेंगे -रेशीमबाग