वाडेगावकर, डॉ. काणे यांनी आठवणी जागवल्या

ज्या गायिकेच्या श्वासानिश्वासात फक्त संगीत आणि संगीताचाच ठेवा होता अशा जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिकेचे जीवनगाणे भैरवीच्या रूपाने सोमवारी रात्री कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक संपले. भारतीय अभिजात संगीतातील भरजरी, श्रीमंत सुरांचा अस्त झाला आणि अवघे संगीत विश्व शोकमग्न झाले. नागपुरात ज्या ज्यावेळी किशोरीताईंची मैफिली होत असे त्यावेळी तबल्याच्या साथीला विदर्भातील ज्येष्ठ तबलावादक पं. गोपाळराव वाडेगावकर असतील तरच मैफिल करेन असा त्यांचा प्रेमळ आग्रह असायचा. त्यामुळेच वाडेगावकर यांच्याशी त्यांचे एक वेगळे ऋणानुबंध निर्माण झाले होते. मुंबईला असताना त्यांच्या संगीत साधनेचा लाभ घेणारे डॉ. श्रीराम काणे यांच्यावर तर त्यांनी शिष्य म्हणून भरभरून प्रेम केले. किशोरीताईंनी षड्ज, पंचम आणि निषादांच्या मैफिलीतून ‘एक्झिट’ घेतल्यावर या दोन्ही मान्यवरांनी त्यांच्या भावगर्भित आठवणीं जागवल्या.

गोपाळराव वाडेगावकर म्हणाले, किशोरीताईंचे संगीतातील स्थान धृवताऱ्यासारखे अढळ असून त्यांचे या क्षेत्रातील योगदान अनमोल आहे. म्हणूनच संगीत क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांची कोणीही बरोबरी करू शकत नाही. एकटय़ा विदर्भातच नाही तर संपूर्ण भारतात त्यांना अनेक कार्यक्रमात साथसंगत केली.

मुंबई आकाशवाणीत रेकॉडिंगला येत होत्या त्यावेळी मी साथीला आहे की नाही याची विचारपूस करूनच त्या येत होत्या. नागपूरमधील ‘मैफिल’ आणि ‘सप्तक’ या संस्थांनी आयोजित केलेल्या जवळपास सर्वच कार्यक्रमात मी त्यांना साथसंगत केली. तंबोरे सुरात जुळवण्यासाठी त्या नेहमीच आग्रही असतं. वाडेगावकर तबला वाजवत नाही तर ते गाणं वाजवतात म्हणून त्या अनेकांना सांगायच्या. किशोरीताई म्हणजे संगीतातील ध्रुवतारा. त्यांची गायकी संगीत क्षेत्रात ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहील.

व्यक्ती म्हणून त्या मोठय़ा होत्याच पण संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान वरच्या ‘सा’ सारखे होते त्यामुळे पुन्हा किशोरी आमोणकर होणे नाही अशा शब्दात गोपाळरावांनी किशोरीताईंच्या अनेक मैफिलीतील अनेक आठवणी सांगितल्या.

ताईंचे गाणे देहभान विसरून टाकणारे

डॉ. काणे यांनी आपल्या गुरूंविषयीची आदरभावना व्यक्त केली तीच मुळी किशोरीताईचे गाणे रसिकांना देहभान विसरून टाकणारे होते, हे सांगून. मैफिलीत ख्यालगायनाला प्रारंभ केला की त्या रागाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचून प्रत्येकवेळी त्या त्या रागांचे ‘फिलिंग’ त्यांना वेगळीच अनुभूती देत असे. मुंबईला असताना माझ्याकडे सतार नव्हती तर त्यांनी ती बांधून दिली होती. पाच ते सहा महिने त्यांच्याकडे शिकलो, मात्र नागपूरला आल्यावर जाणे झाले नाही. त्या ‘मुडी’ आहे, असा लोकांचा समज होता. मात्र एखाद्याशी सूर जुळले की त्या त्याच्यावर भरभरून प्रेम करायच्या. माझे लग्न ठरल्यावर सर्वात प्रथम मी पत्नीसह त्यांच्या भेटीला गेलो. निर्मळ मन आणि सतत संगीताशी तादात्म्य पावलेल्या आणि अखेपर्यंत त्यातच रमलेल्या किशोरी ताईचे संगीत हे खरे दैवी गाणे होते. त्यांच्या चेहऱ्यावर कधी कुठल्याही गोष्टीचा त्रागा दिसायचा नाही. कायम प्रसन्नचित्त असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांची प्रत्येक मैफिल ही रसिकांना आनंद सागरात रममाण करणारी ठरायची.