प्राध्यापक मुलगा आहारी

नागपूर : अंमली पदार्थापेक्षाही ‘पबजी’ हा मोबाईल गेम धोकादायक असल्याचे हळूहळू समोर येत आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका न्यायाधीशांचा प्राध्यापक मुलगा या गेमच्या प्रचंड आहारी गेला आहे. मुलाला लागलेले हे वेड बघून न्यायाधीशही चिंतेत असून मुलाला यातून बाहेर काढण्यासाठी काय करावे, याचा सतत विचार करीत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देत असताना पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी धरमपेठ परिसरातील व्यक्तीचा नवव्या वर्गात शिकणारा मुलगाही पबजीच्या खूप आहारी गेल्याचे समोर आले होते. त्याने पबजी खेळण्यासाठी मित्राला पैसे देऊन मोबाईल खरेदी केला. तो मोबाईल त्याने मित्राकडेच ठेवला व शाळेच्या वेळेत तो पबजी खेळत होता. शाळा व शिकवणी बुडवून त्याचा हा प्रकार सुरू होता. एरव्ही ९० ते ९५ टक्के घेणारा मुलगा नापास होऊ लागल्याने आईवडिलांना चिंता लागली व त्यांनी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याचा फायदा घेऊन त्याच्या मित्रांनी त्याला लाखो रुपयांनी लुबाडले होते. तसेच आईवडिलांना माहिती न देण्यासाठी त्याच्याकडून नियमित पैशाची मागणी करायचे. शेवटी मुलाच्या आईवडिलांनी इतर मुलांच्या पालकांना बोलावून सर्व वस्तुस्थिती सांगितली. यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयातून सेवानिवृत्त झालेल्या न्यायाधीशांचा मुलगाही या गेमच्या खूप आहारी गेल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, न्यायाधीशांचा मुलगा हा एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पण, त्याची स्वत:ची प्रकृती बिघडली तरी त्याची आई पबजीमुळे तब्येत बिघडल्याचे सांगते. मुलाचे हे वेड बघून आई-वडिलांनाही चिंता लागली असून त्याचे हे व्यसन सोडवण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना करण्यात येत आहे. एकप्रकारे हे गेम अंमली पदार्थापेक्षा अधिक धोकादायक असल्याची प्रतिक्रिया सेवानिवृत्त न्यायाधीशाने व्यक्त केली.

रात्रभरात संपवला पाच फोनचा डेटा

पबजी गेम खेळण्यासाठी एका शाळकरी मुलाने रात्री आईवडील व इतर नातेवाईकांचे मोबाईल घेतले होते. सर्वजण झोपल्यानंतर पहाटे ३ वाजेपर्यंत तो पबजी खेळला. तोपर्यंत पाच मोबाईलमधील इंटरनेट पॅकचा डेटा संपल्यानंतरच तो झोपी गेला. सकाळी सर्वजण उठून व्हॉट्स अ‍ॅप व फेसबुक बघायला घेतले असता इंटरनेट चालत नव्हते. शेवटी चौकशी केली असता त्यांचा मोबाईल डेटा पबजीसाठी वापरला गेल्याचे कळले, हा अनुभव त्या मुलाच्या मामाने सांगितला.