स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष

शहरातील विविध ठिकाणी महिलांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था पाहिली तर कचरागृहे आहेत का, असा प्रश्न पडतो. महिलांना त्या ठिकाणी जाणे अवघड झाले आहे.

महिला स्वच्छतागृहाची मागणी शहरात अनेक वर्षांपासून आहे, त्यासाठी विविध महिला संघटना आणि महिला नगरसेविकांनी पाठपुरावा केल्यावर महापालिकेने शहराच्या काही भागात, बाजारपेठा व इतर वर्दळीच्या ठिकाणी रोटरी क्लबसह इतरही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून स्वच्छतागृहे बांधण्यात आली. मात्र, त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्याची अवस्था दयनीय झाली आहे. तेथील अस्वच्छतेमुळे महिलांना तेथे जाणे नकोसे झाले आहे. ग्रेट नाग मार्गावरील खासगी बसच्या ठिय्याजवळ रोटरीच्या वतीने स्वच्छतागृह कमालीचे घाणेरडे आहे. अशीच परिस्थिती नंदनवन, इतवारी किराणा ओळ, कळमना भागातील स्वच्छतागृहाची झाली आहे. गोकुळपेठ बाजार परिसरातील स्वच्छतागृहाजवळ भाजी विक्रेत्यांचा वावर असल्याने महिला तेथे जाणे टाळतात.

महाराजबाग, सिरसपेठ, जरीपटका भाजीबाजार, गांधीसागर तलाव, बालभवन, बडकस चौक, गोकुळपेठ बाजार, मेयो रुग्णालय परिसरातील स्वच्छतागृहांची स्थिती वेगळी नाही. महापालिका म्हणते ही जबाबदारी स्वयंसेवी संस्थांची आहे, तर स्वयंसेवी संस्था फक्त स्वच्छतागृहे उभारून मोकळ्या झाल्या आहेत.

यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी करण्यात आल्यावरही सुधारणा झाली नाही. महापालिकेने जागा दिली व रोटरीने स्वच्छतागृहे उभारली. त्यांनी स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही. महापालिकेचे सफाई कर्मचारी त्या ठिकाणी सफाई करीत नाहीत. परिसरातील लोकं तेथे कचरा टाकतात. त्यामुळे त्याला कचराघराचे स्वरूप आले आहे.

खाजगी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी स्वच्छतागृहाती निर्मिती केली तर त्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागासोबतच ज्या संघटनेने जबाबदारी त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी अस्वच्छता असेल तर त्यामुळे रोगराई पसरण्याची भिती असते त्यामुळे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत आरोग्य विभागासह त्या त्या प्रभागातील नगरसेवकांनी सुद्धा लक्ष दिले पाहिजे आणि तेथील स्वच्छचा करुन घेतली पाहिजे.

– प्रगती पाटील, नगरसेविका, भाजप

शहरातील मोबाईल स्वच्छतागृहे रोटरीसह काही खासगी संस्थांनी उभारली असून तेथील स्वच्छतेची व इतर व्यवस्थापनाची जबाबदारी ही त्याच संस्थांकडे आहे. तसा करार झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करीत नाहीत. खासगी संस्थेने उभारलेल्या स्वच्छतागृहाबाबत तक्रारी आल्या असून त्याबाबत लवकरच पाहणी करून संबंधित संस्थेला पत्र देण्यात येईल.

– डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी, महापालिका