खासगी वाहनांमध्ये सतत वाढ
वाहतूक व्यवस्था – भाग १
smartcityस्मार्ट सिटीची संकल्पना आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेचे वास्तव बघितल्यास अत्यंत विदारक स्थिती आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या नावावर येथे खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून ‘स्टार बस’ सेवा सुरू आहे. काही निवडक मार्गांवर ही बससेवा असून फेऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार नाही. त्यामुळे प्रत्येकाला ऑटोरिक्षा किंवा स्वतच्या वाहनांचाच वापर करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे या वाहनांच्या संख्येत दिवसागणिक बरीच वाढ होत आहे. दुसरीकडे, सार्वजनिक वाहतुकीच्या नावाने बोंब असल्याने ऑटोरिक्षाचालकांची मनमानी असलेले शहर, अशी ओळख निर्माण झाली आहे. ऑटोरिक्षा मीटरप्रमाणे धावण्यासंदर्भात अनेकदा मोहीम राबवूनही ते विनामीटरनेच चालत आहेत. नागपूरची लोकसंख्या, कामानिमित्त दररोज बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणि त्याच्या प्रमाणात शहर बस उपलब्ध नाहीत.
शहरातील वाहतुकीसंबंधी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने एल. अँड टी. रामबॉल कन्स्लटिंग इंजिनीअरिंग लिमिटेडकडून २००८ मध्ये नागपूर शहर वाहतूक आणि वाहनतळाबाबत बृहत आराखडा तयार करवून घेतला होता.

३० हजार लोकांची रेल्वेतून ये-जा

नागपूर रेल्वेतून दररोज सुमारे ६० हजार लोक ये-जा करतात. त्यांना तेथपर्यंत सोडण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था नाही. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रवासी, खासगी वाहने, ऑटोरिक्षा किंवा पायदळ येथेपर्यंत पोहोचतात आणि तेथून बाहेर पडतात. अशीच परिस्थिती अजनी, इतवारी आणि कळमना रेल्वे स्थानकावरील आहे. गणेशपेठ बसस्थानकावरून दररोज सुमारे ३० हजार आणि मोरभवन बस स्थानकाहून २२ हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांनाही खासगी वाहने, ऑटोरिक्षांशिवाय पर्याय नाही.
स्मार्ट सिटीत कुणालाही कुठूनही अगदी चालत जाऊन सार्वजनिक वाहन मिळायला हवे तेव्हा कुठे खासगी वाहनांचा वापर बंद होईल. दिवसभरात सुमारे साडेबारा लाख लोक एकाच वेळी शहरातील रस्त्यांवर असतात. त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हवी तशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही.

मी बेसा रोडवर चंडिकानगरात राहतो. मी के.डी.के. इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा प्रथम वर्षांचा विद्यार्थी आहे. चंडिकानगर येथून नंदनवनला जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही, तसेच ऑटोरिक्षा या मार्गावर धावत नाही. दररोज स्पेशल ऑटोरिक्षा करून जाणे परवडत नाही. शिवाय, वेळेवर ऑटोरिक्षा उपलब्ध होत नाही. येथून आधी ऑटोरिक्षाने बैद्यनाथ चौकात यावे लागते आणि तेथून मग महाविद्यालयात जाण्यासाठी ऑटोरिक्षा करावा लागतो. यामुळे वेळ वाया जातो, तसेच पैसेही अधिक खर्च होतात.
कुणाल मुळे

वाहनांची संख्या
* दुचाकी- १२ लाख ३ हजार ७०८
* कार- १ लाख २४ हजार ९९४
* जिप्स – ३६ हजार २१६
* प्रवासी ऑटोरिक्षा- १० हजार ४६४
* खासगी ऑटोरिक्षा- ४ हजार २०

२०११ च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ६६५ आहे. प्रत्यक्षात आज शहरात सुमारे ३५ लाख लोक वास्तव्याला आहेत.
बसेस हव्यात ७५०, धावतात १९५ महापालिकाने शहर बस वाहतुकीचे कंत्राट वंश निमय कंपनी दिले आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाअंर्तगत महापालिकेला २३० बसेस मिळाल्या होत्या. वंश निमय कंपनीने २४० बसेस खरेदी केल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी सध्या जेएनएनयूआरएमच्या १७२ आणि वंश निमय कंपनीच्या ५३ अशा एकूण २२५ आहेत. त्यापैकी सुमारे ३० बसेस देभभाल दुरुस्तीसाठी उभ्या केल्या जातात. म्हणजे, प्रत्यक्षात दररोद १९५ बसेस धावतात. जेव्हा की, शहराची गरज ७५० बसेसची आहे.