अविष्कार देशमुख

शहरातील तब्बल ४५० विहिरींना ‘वाईट दिवस’

कधीकाळी शहराचे वैभव असलेल्या आणि शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या सार्वजनिक विहिरी आज आपल्या दुरवस्थेवर अश्रू ढाळत आहेत. या विहिरीच्या पाण्यात बिअरच्या बाटल्या, फाटके जोडे अशा टाकाऊ वस्तू टाकल्या जात असल्याने आणि सतत सांडपाणी झिरपत असल्याने लोकांनी या विहिरींकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने या विहिरीतील गाळ आणि कचरा साफ करण्यासंदर्भात अनेकदा आदेश दिले, परंतु त्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे हे शाश्वत स्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

शहराच्या विविध प्रभागातील तब्बल ४५० सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. काही वस्त्यांमध्ये नाईलाजाने विहिरीच्या दूषित पाण्याचा वापर सुरूच असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  किंबहुना आजही अनेक वस्त्यांमध्ये विहिरीच्या पाण्याचा उपयोग मोठय़ा प्रमाणात केला जातो.  घरात नळाचे पाणी पोहोचले असतानाही शहराच्या अनेक भागात धुणे, भांडी आणि इतर उपयोगासाठी विहिरीचे पाणी वापरण्यात येत आहे. मात्र, वस्त्यांमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने अनेक विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. शहरात ५५० सार्वजनिक विहिरी असून त्यापकी ४५० विहिरी दूषित झाल्याची नोंद महापालिकेकडे आहे. या विहिरींमध्ये कचरा आणि गाळ आढळून आला आहे. त्यामुळे  विहिरी स्वच्छ करून त्यातील पाणी वापरण्यायोग्य करण्यासाठी महापालिकेने  सार्वजनिक विभागाला कळवले, परंतु यंत्रणा नेहमीप्रमाणे ठप्प आहे. परिणामी, नागरिकांना अस्वच्छ पाण्याचा वापर करावा लागत असून शहरातील जवळपास ७० हून अधिक विहिरी सांडपाण्याने भरल्या आहेत. २० च्यावर विहिरी विकासकामात अडथळा निर्माण करत असल्याने कायमच्या बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या वस्त्यांमध्ये पूर्वी या विहिरीमुळे पाणी मिळायचे आता तेथील नागरिकांना नळाच्या किंवा टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

पाणी वापर सुरू असलेल्या विहिरी

* दक्षिण नागपूर : वकीलपेठ, योगेश्वरीनगर, बिडीपेठ, रिपब्लिकन वसाहत

* पूर्व नागपूर : सतरंजीपुरा, बाबुळबन, बस्तरवारी, प्रेमनगर, साहेबलाल वाडी

* उत्तर नागपूर : कुऱ्हाडकर पेठ, पिवळी नदी, भदंत आनंद कौसल्यानगर, नारी

* मध्य नागपूर : खदान, मोटघरे मोहल्ला

* पश्चिम नागपूर : खलासी लाईन बगीच्याजवळ, टाकळी, सुरेंद्रगढ

* दक्षिण पश्चिम नागपूर : दंतेश्वरीनगर, धनगरपुरा, चुनाभट्टी, प्रियंकावाडी, तकिया

विभागनिहाय सार्वजनिक विहिरींची संख्या

* लक्ष्मीनगर   – ४०

* धरमपेठ      – ५०

* हनुमाननगर  – ५१

* धंतोली       – २३

* नेहरूनगर    – ६५

* लकडगंज     – १३

* मंगळवारी    – ४७

सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित होऊ नये, याची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांनी घ्यावी. विहिरीच्या कठडय़ांची उंची वाढवावी तसेच सांडपाण्याची वाहून जाण्याची योग्य ती सोय करावी. नागरिकांनी विहिरीत कचरा टाकू नये. पिण्याचे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे. यावर्षी पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विहिरी साफ करण्याचे अभियान हाती घेतले असून अनेक विहिरी स्वच्छ केल्या आहेत.

– पिंटू झलके, सभापती जलप्रदाय विभाग मनपा

उन्हाळ्यात महापालिकेकडून विहिरी स्वच्छ करण्यासाठी यादी देण्यात आली होती. त्याप्रमाणे नेहरूनगर झोनमध्ये ६५ विहिरी स्वच्छ करण्यात आल्या. त्यातील पाणी वापरण्यायोग्य आहे. मात्र, नागरिक त्यात कचरा टाकत असल्याने अनेक विहिरी दूषित होत आहेत. तसेच विहिरी शेजारीच भांडे धुण्यात येत असल्यानेही सांडपाणी विहिरीत जाते. नागरिकांनी हे टाळले पाहिजे.

– सचिन रक्षमवार, उपअभियंता नेहरूनगर झोन