कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षांला उजाळा

नागपूर : विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत श्रावण दगडे यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी शैलेशकुमार मेश्राम यांच्या हस्ते रविवारी १८ जुले रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष अशोक दगडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. राज्य सरकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी  कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस मदनसिंह, उमेशचंद्र चिलबुले यावेळी उपस्थित होते. श्रावण दगडे यांच्या १०५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी म्हणजे सीपी अ‍ॅण्ड बेरार प्रांत असताना श्रावण दगडे यांनी देशातील पहिली सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन के ली होती. ज्या काळात कुठल्याही सुविधा नव्हत्या अशावेळी कर्मचारी संघटना बांधणीसाठी श्रावणजी दगडे यांनी जिल्ह्य़ा जिल्ह्य़ात जाऊन कर्मचाऱ्यांच्या भेटी घेतल्या व संघटना उभी केली होती. आज तिला वटवृक्षाचे स्वरूप आले आहे.  ६ जानेवारी १९६९ मध्ये नागपूर मध्ये झालेल्या संघटनेच्या अधिवेशनाला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. दगडे हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. १९४५ ते १९७५ या काळात ते कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी कायम लढा दिला होता. अशा आठवणी यावेळी वक्तयांनी सांगितल्या.

प्रास्ताविक ल. ना. मोरे यांनी केले, संचालन देविदास बढे यांनी केले. आभार श्रीकांत जामगडे यांनी मानले. पुस्तकाचे लिखाण ल.ना. मोरे यांनी केले. कार्यक्रमास प्रतिनिधीची आकोला, बुलढाणा,अमरावती या जिल्ह्यतील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.