हिंगणा तालुक्यातील शेतकरी कर्जमाफी आणि पीक कर्जासाठी गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि बँकेचे खेटे घालत आहे. मात्र बँकेने केलेल्या चुकांची शिक्षा येथील शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे.

हिंगणा तालुक्यातील खडकी या गावात तब्बल ३८ शेतकऱ्यांना बँक ऑफ इंडियाच्या चुकांचा  फटका बसला. बँकेने कोणाचे कर्ज दुप्पट दाखवले तर कुणाला कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम आधी भरा. त्यानंतर कर्जमाफी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असताना काही शेतकऱ्यांना केवळ १६ हजार, २० हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.

खडकी येथील गंगाधर आनंद बुधबावरे  यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियामधून ऑक्टोबर २०१४ ला ८७ हजार (३३ हजारांचे वैयक्तिक कर्ज आणि ४५ हजारांचे तात्काळ कर्ज) रुपयांचे कर्ज घेतले. तसेच २०१३ ला नागपूर को-ऑप. डिस्ट्रिक बँकेतून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी योजना जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज केला, परंतु पहिल्या यादीत नाव आले नाही. दुसऱ्या यादीत आले, परंतु त्यात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे दिसून आले. त्याचे दोन्ही बँकेचे कर्ज एकूण एक लाख ३७ हजार रुपये आहे. बँक ऑफ इंडियाने ३३ हजार रुपयाची नोंद दोन वेळा केल्याचे स्पष्ट झाले. बँकेने आणि जिल्हा उपनिबंधकाने ही चूक मान्य देखील केलीआहे, परंतु शेतकऱ्यांना कर्ज माफ झालेले नाही आणि नवीन कर्ज देखील देण्यात आले नाही.

याच तालुक्यातील कान्होलीबारा येथील अनिल नानाजी लाड या शेतकऱ्याकडे दोघा भावांची मिळून दहा एकर शेती आहे. त्यांनी ९ जून २०१५ ला युनियन बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला, परंतु दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी आधी एक लाख ४३ हजार ६२२ रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे एक लाखाच्या कर्जावर एक लाख  ४३ हजार रुपये भरून वन टाईम सेटलमेंट करण्याची सूचना करण्यात आली आहे.

ताबडतोब त्रुटी दूर करून शेतकऱ्यांचे नाव ग्रीनलिस्टवर येणे हा यावरील उपाय आहे. याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो.’’

– विलास पराते, प्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया.

‘‘बँक ऑफ इंडिया, शाखा हिंगणा यांनी दिलेल्या  अहवालानुसार गंगाधर आनंद बुधबावरे यांचे नाव कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमध्ये आले होते. परंतु चुकीची रक्कम दर्शवण्यात आलेली होती. त्यानंतर टी.एल.सी. डाटा अपलोडमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. दुरुस्तीनंतर पुढे येणाऱ्या ग्रीनलिस्टमध्ये नाव आल्यानंतर कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच  नवीन कर्ज वाटप करण्यात येईल. बँकेने चूक केली आहे. परंतु त्यांच्यावर जिल्हा उपनिबंधकांचे नियंत्रण नाही.’’

– अजय कडू, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर.