‘अ‍ॅग्रोव्हिजन’चा समारोप

विदर्भातील शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी बांबूची लागवड करावी, त्यांच्याकडून ऊसाच्या दरानुसार खरेदी केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केली.

‘अ‍ॅग्रोव्हिजन-२०१७’ कृषी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, मध्यप्रदेशचे कृषीमंत्री गौरीशंकर बिसेन, हरयाणाचे कृषीमंत्री ओमप्रकाश धनकड उपस्थित होते.

विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पूरक उद्योगाचे महत्त्व सांगताना गडकरी यांनी बाबू लागवडीचे महत्त्व यावेळी विशद केले. बांबूपासून विविध वस्तू, लोणचे, कापड तसेच इतरही अनेक वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. त्यामुळे त्याला मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने बांबूवरील वाहतूक परवान्याची (ट्रान्सिट पास) अट रद्द केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात बांबू लावगड करावी. त्यांना तो कुठेही विकता येणे शक्य आहे. कोणी खरेदी केला नाही तर सर्व बांबू मी खरेदी करेन. हा माझा शब्द आहे, असे गडकरी म्हणाले.

..तर सरकारची तिजोरी रिकामी

मध्यप्रदेश आणि हरियाणा सरकारचे कृषीमंत्री कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने मध्य प्रदेश सरकारकडून हमीभाव आणि प्रत्यक्ष भाव यातील फरकाची रक्कम बोनस म्हणून देणे आणि हरयाणा सरकारकडून पीक हानीपोटी आर्थिक मदत देणे आदींचा समावेश होता. त्यावर गडकरी म्हणाले, अशाप्रकारे शेतकऱ्यांना बोनस दिल्यास सरकारी तिजोरी रिकामी होईल. त्यामुळे बोनस न देता पीकपद्धत बदलावी लागेल. त्यासाठी विदर्भात आम्ही प्रयत्न करीत आहोत.