चार्लीना स्थळभेटीसह ‘पंचिंग’ बंधनकारक

नागपूर : उपराजधानीतील पोलीस व्यवस्था मजबूत करण्यासाठी व  शहरातील गुन्हेगारांचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ‘क्यूआर कोड’ ठेवण्यात येणार असून एका अ‍ॅपच्या माध्यमातून त्याचे व्यवस्थापन होणार आहे. आता बीट मार्शल व चार्लीना ‘पंचिंग’ करणे अनिवार्य असणार आहे.

शहरात नियमित गुन्हे घडणारी काही ठिकाणे असून त्या  परिसरात गुन्हेगारांचाही नियमित वावर असतो. येथे टोळीयुद्धातून गुन्हे घडत असतात. त्यामुळे शहरातील अशा स्थळांची नोंदणी करून  त्या ठिकाणी पोलिसांचे नियमित लक्ष असावे, अशी योजना आखण्यात आली आहे. अशा ठिकाणी दिवसा व रात्रीही भेट देण्याचे आदेश  चार्ली व बीट मार्शल यांना देण्यात आले आहेत. परंतु, ते त्या ठिकाणांना भेट देतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात ‘सुबाहु’ नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कोड ई बीट सिस्टम ही प्रणाली  १ नोव्हेंबर २०२० ला प्रायोगागिक तत्त्वावर प्रतापनगर आणि  बजाजनगर पोलीस ठाण्यात राबवण्यात आली. त्या अंतर्गत  पाणीरोधक क्यूआर कोड ‘हॉटस्पॉट’वर ठेवण्यात आले. त्यानंतर परिमंडळ १ अंतर्गत येणारे वाडी, हिंगणा, सोनेगाव आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा एकूण ठिकाणी ३७७ ठिकाणी हे बसवण्यात आले. त्या ठिकाणी चार्ली व बीट मार्शल यांनी भेट देऊन क्यूआर कोड स्कॅन केले. यामुळे त्यांनी या स्थळांना भेट दिल्याचे स्पष्ट झाले. आता ही प्रणाली शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हॉटस्पॉटवर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरात १ हजार ५०० क्यूरआर कोड बसवण्यात आले आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन लोकेशन बघू शकतात. या प्रणालीचे शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.