परीक्षा रद्द करण्याला अनेकांचा विरोध

नागपूर : केंद्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर राज्य शिक्षण मंडळानेही इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर आता मूल्यांकनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने बारावी हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते. शिवाय अकरावीचे शिक्षण हे नाममात्र राहत असून दहावी उत्तीर्ण होताच विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष हे बारावीच्या अभ्यासावर केंद्रित होते. त्यामुळे अकरावीतील गुणांच्या आधारे बारावीचे मूल्यांकन होणार तरी कसे, असा सवाल शिक्षक उपस्थित करीत आहेत.

नागपूर विभागातून बारावीच्या १ हजार ५२३ कनिष्ठ महाविद्यालयातून १ लाख ४६ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांच्या परीक्षांसाठी ४७४ केंद्र आणि ९३८ उपकेंद्र तयार करण्यात आले होते. करोनाची संपूर्ण काळजी घेऊन परीक्षा केंद्रांची रचना करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता केवळ केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य शासनानेही परीक्षा रद्द केल्याचा आरोप  शिक्षकांकडून होत आहे. बारावीमध्ये ९० टक्क्यांवर गुण घेणारे विद्यार्थी अकरावीमध्ये केवळ ५० ते ६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होतात. त्यातच करोनामुळे अकरावीचे वर्गच झाले नाही. ऑनलाईन शिक्षणाचाही काही संबंध नाही. त्यामुळे अकरावीच्या आधारे बारावीचे मूल्यांकन करणे शाळांसाठी फारच अडचणीचे आहे. बारावीसारख्या महत्त्वाच्या वर्षांचे मूल्यांकनच करता येणार नसल्याने प्राध्यापक चिंतेत असून विद्यार्थी, पालकांमध्येही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.