पाण्यात प्राणवायूचे प्रमाण घटले, घाणीमुळे मूळ स्वरूप हरवले!
तलाव ही नागपूरची ओळख! काही तलावांना ऐतिहासिक वारसा! मात्र, तलावांची सध्याची अवस्था पाहता ते किती दिवस तग धरतील यावर जरा शंका आहे. जलाशयातील पाण्याची पातळीच नव्हे तर प्राणवायूची मात्रा कमी होत आहे आणि पाण्याचा मळकटपणाही वाढत चालला आहे. शहराचे उत्सवी रूप आणि त्याला असलेला धार्मिक रंग या बाबीही तलावांच्या या दुरावस्थेस तेवढय़ाच कारणीभूत ठरत आहेत.
गणेशोत्सव किंवा देवीचा उत्सव हे केवळ निमित्तमात्र आहेत. त्यांच्या विसर्जनाचा परिणाम तलावातील पाण्यावर होत आहेच, पण त्याचवेळी बऱ्याच अशा गोष्टी आहेत, त्यामुळे या तलावांची रया दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील तलावांची समोर आलेली भीषण अवस्था तलावांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्याच पाश्र्वभूमीवर शहरातील काही प्रमुख तलावांचा घेतलेला हा वेध!
’ सोनेगाव तलाव
सोनेगाव तलाव हा भोसलेकालीन! भोसल्यांनी त्यांच्या कार्यकाळात सोनेगाव शिवारात तो बांधल्याने तलावालाही सोनेगाव नाव पडले. त्याकाळात विस्तीर्ण अशा या तलावाची अवस्था आता अर्धीही राहिलेली नाही. आजूबाजूच्या टोलेजंग इमारतींनी या तलावाचे आकारमान कमी केले आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या तलावाचे सौंदर्यीकरणही लयाला गेले. या तलावात चारही बाजूने आधी पाणी येत असल्याने तलावात कायम पाणी भरलेले असायचे आणि आजची अवस्था पाहिली तर केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या तलावात ४० टक्क्याहूनही कमी पाणी राहिलेले आहे. आजूबाजूला येणाऱ्या पाण्यामुळे कधीकाळी हा तलाव पूर्णपणे भरलेला असायचा. मात्र, तलावात साठणाऱ्या पाण्याचे हे मार्ग आता बंद झाले आहेत. या तलावात जलपर्णी वनस्पतींचा त्रास नाही किंवा प्राणवायूची विशेष कमतरता नाही, पण तलावात पाणी कमी असल्यामुळे पाण्याचा मळकटपणा नक्कीच वाढला आहे. तलावाच्या काठावर असणारे दोन मंदिर आणि आताशा या तलावाचे सौंदर्यीकरण झाले असले तरीही पाण्याअभावी तलाव ओस पडत आहे.
’ गांधीसागर तलाव
सोनेगावसारखाच गांधीसागर तलावही भोसलेकालीन! त्याला शुक्रवारी तलाव म्हणून देखील ओळखले जाते. भोसले राजवटीदरम्यानच तो बांधला गेला. तलावाच्या चारही बाजूंनी असलेले दगडी काम आणि उत्तरेला बेट यामुळे शहरातील इतर तलावांच्या तुलनेत तो आगळाच! मात्र, या तलावाचा ऐतिहासिक वारसा पुसट होऊन आत्महत्यांसाठी तो अधिक ओळखला जातो. तलावाच्या चारही बाजूंनी रस्ते आहेत. या तलावामुळे जुन्या शहरामधल्या विहिरींचा पाण्याचा स्तरही कायम वाढलेला असायचा. मात्र, हाच तलाव आता सर्वाधिक प्रदूषित आहे. टाटा समूहाच्या एम्प्रेस मिलच्या जागी उभारलेल्या मॉलच्या बाजूने एक रस्ता आहे आणि या रस्त्याने गांधीसागर तलावाजवळ गेल्यास घाणीचे साम्राज्य आहे. तलावाच्या चारही बाजूंनी चहा, नाश्तावाल्यांच्या टपऱ्या असून त्यांचाही कचरा याच तलावात जातो. तर तलावाच्या सभोवताल असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये बेवारस लोकांनी त्यांचे संसार थाटल्याने त्यांचीही धुण्याभांडय़ांची मदार याच तलावांवर अवलंबून आहे. या तलावात जलपर्णी वनस्पतीचे साम्राज्य नाही, पण घाणींच्या साम्राज्यामुळे मूळ तलाव हरवत चालला आहे.
’ फुटाळा तलाव
फुटाळा तलाव बांधणीसुद्धा भोसले राजवटीतच! शहराच्या पश्चिम भागातील या तलावाला तेलंगखेडी तलाव असेही म्हणतात. तलावाच्या पूर्व बाजूला पाणी अडवण्यासाठी बांध घातला असून हाच बांध आता नागपूरची चौपाटी म्हणून ओळखला जातो. या पाळीवर बसून मासेमारी करणे हा अनेकांचा शौक! ही चौपाटी दिवसेंदिवस बहरत चालली, पण तलाव मात्र तेवढय़ाच वेगाने संपत चालला आहे. तलावाच्या एका बाजूने झोपडपट्टी तर दुसऱ्या बाजूने एअरफोर्सचा परिसर आणि या दोन्ही बाजूने तलाव मोठय़ा प्रमाणावर घाण झाला आहे. फुटाळा तलावावर जलपर्णी वनस्पतींचे आक्रमण वेगाने वाढत आहे आणि जवळपास अध्र्याअधिक तलावावर जलपर्णी वनस्पतींनी आक्रमण केले आहे. एकीकडे घाणीचे साम्राज्य तर दुसरीकडे जलपर्णी वनस्पतींचा वेग असाच वाढत राहिला तर कदाचित केवळ चौपाटीवर समाधान मानावे लागेल. शहरातील इतर तलावांच्या तुलनेत फुटाळा तलावात पाणी भरपूर आहे, पण स्वच्छता, प्राणवायूच्या बाबतीत फुटाळा तलाव अग्रेसर आहे. आता तर चौपाटीवर थाटलेल्या लहानमोठय़ा दुकानांचा संपूर्ण केरकचरा याच तलावाच्या स्वाधीन केल्या जातो.

गणपती, देवी विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होत आहेत, पण त्याहीआधी होणारे गौरी विसर्जन, घट विसर्जन यातून तलावात मोठय़ा प्रमाणावर तेलाचा स्तर वाढत आहे आणि हाच स्तर माशांच्या मृत्यूसाठी आणि तलावाच्या पाण्यातील प्राणवायू कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. कृत्रिम तलावांची निर्मिती ही मोठय़ा मूर्तीसाठी पुरक नाही. त्यामुळे मोठय़ा मूर्ती तलावातच जातात आणि मूर्तीची माती तलावातच रुतून बसल्याने तलावाची खोली कमीकमी होत आहे. शहरातील या सर्वच तलावातील पाण्याचा धुळकटपणा वाढत आहे तर प्राणवायू कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर पर्याय शोधला नाही तर शहरातील उत्सव निमित्तमात्र ठरतील आणि तलाव मात्र मृतप्राय होतील, असे पर्यावरण अभ्यासक सुरभी जयस्वाल म्हणाल्या.