विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

देवेश गोंडाणे, नागपूर</strong>

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी किती काळ नवीन वसतिगृहाची प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. नवीन वसतिगृहासाठी विद्यापीठाने फेब्रुवारी २०१८ मध्ये अर्थसंकल्पामध्ये १० कोटींची तरतूद केली. वसतिगृहाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही पाठवण्यात आला. मात्र, दीड वर्षांपासून पैशाची तरतूद होऊनही साधे भूमिपूजन न झाल्याने प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

विद्यापीठात शिक्षणाचे विद्यार्थ्यांना एक वेगळे आकर्षण असते. त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या ३२ विभागांमध्ये विदर्भासह अन्य राज्यातील हजारो विद्यार्थी मोठय़ा संख्येने शिक्षण घेतात. मात्र, बाहेरून येणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून आवश्यक सुविधा पुरवल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यापीठाची शहरात मुलांची तीन वसतिगृहे आहेत. यातील पदव्युत्तर मुलांचे वसतिगृह आणि विधि महाविद्यालय वसतिगृहात सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश आहे. या दोन्ही वसतिगृहांची प्रवेश क्षमता केवळ ५०० आहे. तिसरे नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय वसतिगृह हे विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर घ्यावे लागत असल्याने ते आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थी तिकडे जाण्यास धजावत नाहीत. परिणामी, या दोन वसतिगृहांवर अधिक भार असतो. येथील तोकडय़ा जागांसाठी हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज येतात. मात्र, वसतिगृहाची क्षमता कमी असल्याने अधिकांश विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागते. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर भाडय़ाच्या खोलीमध्ये दिवस काढावे लागतात. वसतिगृहासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांची आर्थिक स्थिती ही बिकट असते. अशा स्थितीमध्ये त्यांना भाडय़ाची खोली करून राहणे परवडणारे नसते. त्यामुळे विद्यापीठाने नवीन वसतिगृहाची उभारणी करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून विद्यार्थी संघटनांकडून होत होती. यासाठी विद्यापीठाने २०१८ मध्ये ३०० विद्यार्थीक्षमतेच्या वसतिगृहासाठी १० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. त्यानुसार २८ ऑगस्ट २०१८ ला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासंबंधीचा आराखडाही पाठवण्यात आला होता. प्रस्ताविक नवीन वसतिगृहामध्ये सांस्कृतिक हॉल, वाचनकक्ष, संगणक कक्ष, व्यायाम शाळा आदी बाबींचा समावेश होता. इमारतीच्या बाजूला उद्यान व बसण्याची व्यवस्था होती. मात्र, दीड वर्षांपासून या वसतिगृहाचे भिजत घोंगडे कायमच आहे.

वसतिगृहासाठी विद्यापीठाने प्रस्ताव दिला असून लवकरच त्याबाबत परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे.

– डॉ. नीरज खटी, प्रभारी कुलसचिव.