‘जेलब्रेक’नंतर पुन्हा चर्चेत

मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा दुसऱ्या कैद्याकडून खून होणे, ही गंभीर बाब आहे. ‘जेलब्रेक’नंतर या घटनेने पुन्हा कारागृह प्रशासन चर्चेत आले असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.

३१ मार्च २०१५ ला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मोक्काचे पाच कुख्यात कैदी पळून गेले होते. त्यात बिसेनसिंग ऊर्फ रामूलाल उईके, दत्तेंद्र ऊर्फ राज बहादूर गुप्ता, मोहम्मद शोएब खान ऊर्फ सलीम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि आकाश ऊर्फ गोलू राजू सिंग ठाकूर यांचा समावेश होता.

तेव्हा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तत्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या नेतृत्वात एक सुरक्षा आढावा समिती नेमण्यात आली होती. या समितीने संपूर्ण राज्यातील कारागृहांचा अभ्यास करून सुरक्षा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यानंतर इस्राईलमधील कारागृह सुरक्षा व्यवस्थेच्या धर्तीवर नागपूर मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.

त्यानंतर दोन वर्षांनेच एका तिहेरी जन्मठेपेच्या कैद्याचा खून होणे, ही गंभीर घटना घडली व पुन्हा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा चर्चेला आला. कारागृहातील कैदीही आता असुरक्षित झाले असून प्रशासनाला आतातरी जाग येईल का, असा सवाल करण्यात येत आहे.

हिमायत बेगनेही केला होता दवारेवर हल्ला

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला हिमायत बेग नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून २५ मे २०१६ त्याने बहुचर्चित युग मुकेश चांडक हत्याकांडात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला प्रमुख आरोपी राजेश ऊर्फ राजू धनालाल दवारेवर फाशी यार्डमध्येच हल्ला केला होता. बेगने भाजी वाढण्याच्या मोठय़ा चमच्याने राजेशच्या डोक्यावर वार केले होते. या हल्ल्यातून राजेश बचावला होता. अशा अनेक प्रसंगातून कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले, परंतु सुरक्षा व्यवस्थेला जाग येत नाही, हे विशेष.

कारागृह नियमावलीचे उल्लंघन

सोमवारी आयुष पुगलियाचा खून झाला. एखाद्या कैद्याचा कारागृहात मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाकडून त्याच्या कुटुंबीयांना ताबडतोब कळवावे, असे कारागृह नियमावलीत नमूद आहे. मात्र, सकाळी ७.३० वाजता खून होऊनही कारागृह प्रशासनाने दुपारी १ वाजता पुगलिया कुटुंबीयांना कळवले. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांतून त्यांना समजले होते. त्यांनी १०.३० वाजतापासून कारागृह प्रशासनासाठी अनेकदा संपर्क साधला, परंतु त्यांना काहीच माहिती देण्यात आली नाही किंवा त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्येही घेण्यात आले नाही. अशा प्रशासनावर राज्य सरकार काय कारवाई करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.