नाटय़ संमेलनाध्यक्षपदासाठीही चुरस

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत असून ती चुरशीची होत असताना ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, गंगाराम गवाणकर,. डॉ. विश्वास मेहंदळे आणि श्रीनिवास भणगे यांच्या नावांचे प्रस्ताव समोर आले असून यातही चुरस बघायला मिळणार आहे. राज्यातील विविध भागातील नाटय़ परिषदेच्या शाखांमधून यासाठी नावे मागविण्यात आलेली असताना नागपूरसह विदर्भातून मात्र एकही नाव पाठविण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. चार नावे समोर आलेली असताना कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे, याची चर्चा मात्र काही दिवस रंगणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे होऊ घातलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनासाठी राज्यातील विविध नाटय़ शाखांमधून नावे मागविण्यात आली होती. प्रत्येक शाखेने अध्यक्षपदासाठी मध्यवर्ती शाखेकडे प्रस्ताव देण्यासंदभार्त पत्र पाठविले होते आणि तशी सूचनाही करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांत नाटय़ संमेलन स्थळाबाबत नागपूरचा प्रस्ताव असताना दरवेळी कुठले न कुठले कारण देऊन किंवा उपराजधानीतील कलावंतांचा अनुत्साह बघून शहराला संमेलन आयोजित करण्याचे यजमानपद दिले जात नाही. नाटय़ संमेलन नाही, तर किमान अध्यक्षपदासाठी विदर्भातून काही नावे नाटय़ परिषदेच्या नागपूर शाखेने पाठवावी, अशी अपेक्षा असताना मध्यवर्ती शाखेकडे मात्र विदर्भातील एकाही ज्येष्ठ कलावंताचे नाव देण्यात आलेले नाही. ज्या विदर्भाने अनेक नाटककार घडविले त्या विदर्भात एकही नाटय़ संमेलनाचा अध्यक्ष व्हावा, असे नाव नाही की, परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

अध्यक्षपदासाठी नावे देण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख होती. त्यामुळे ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, गंगाराम गवाणकर, डॉ. विश्वास मेहंदळे आणि श्रीनिवास भणगे यांच्या नावांचे प्रस्ताव मध्यवर्ती शाखेक डे आले आहेत. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात होण्याची शक्यता असल्यामुळे त्यात अध्यक्षांची आणि नाटय़संमेलनाच्या स्थळाबाबत व चार प्रस्तावांपैकी कोणाची निवड होणार, याकडे लक्ष लागले आहे.

अविरोध निवड होते की निवडणूक घेण्याची वेळ येणार, हे नियामक मंडळाच्या बैठकीत स्पष्ट होणार असल्याचे नियामक मंडळाचे सदस्यांनी सांगितले. सातारा किंवा ठाणे या दोन शहरांपैकी एका शहराची संमेलन स्थळाबाबत चर्चा होणार असली तरी यावेळी ठाण्यात संमेलन निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भुसारी निलंबनावर चर्चा

गेल्या महिन्यात झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी यांना कार्यकारिणीतून निलंबित करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तशी नोटीस त्यांना पाठविण्यात आल्याचे मध्यवर्ती शाखेने कळविले होते. संमेलन स्थळ आणि अध्यक्षपदाचा निर्णय होत असताना यावेळच्या बैठकीत भुसारी यांच्या निलंबनाचा आणि नागपूर शाखेच्या बाबतीत चर्चा होण्याची शक्यता आहे.