सामाजिक कार्यकर्त्यां राधा बोर्डे यांचे अपघाती निधन

उत्कर्ष असोसिएशन फॉर ब्लाईंड संस्थेच्या सचिव आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां राधा बोर्डे यांचे आज सायंकाळी अपघाती निधन झाले. त्यांच्या जाण्याने अनेक अंध मुली पोरक्या झाल्याची भावना अनेकांच्या मनात दाटून आली.

दृष्टिहीनांच्या हक्काप्रती सदैव आग्रही असलेल्या राधाताईंनी अत्यंत कष्टाने लुई-राम वाचनालय उभे केले होते. दृष्टीहीन आणि सामान्य लोकांमध्ये संवाद प्रक्रिया वाढावी असा त्यामागे त्यांचा डोळस मानस होता. त्या पूर्णत: दृष्टिहीन असल्या तरी सामान्य माणसाला लाजवेल, असे भगिरथ काम त्यांनी उभे केले होते. दृष्टिहीनांच्या क्षेत्रात फारच कमी लोक काम करतात. त्यातही मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या रोजगाराप्रती सतत जागरुक राहून काम करणारे फार कमी लोक आहेत. अशा मूठभर लोकांपैकी राधाताईंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले  होते. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यात राष्ट्रपती पुरस्कार, लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

त्यांनी बालाजीनगरमध्ये काही काळ भाडय़ाने लुई-राम वाचनालय चालवले. त्यानंतर मानेवाडा मार्गावरील महालक्ष्मीनगरात त्यांना हक्काची जागा मिळाल्याने त्यांनी गेल्या चारपाच वर्षांमध्ये त्याला निवासी वसतिगृहाचे रूप देऊन अंध मुलींना ‘मोबिलिटी’ दिली. या मुलींना वसतिगृहात ठेवण्यासाठी पालक तयार नसायचे. त्यांचे समुपदेशन करून अनेक मुलींना त्यांनी मायेचा आधार दिला. मुलींनी घराचा एखादा कोपरा धरून न बसता शिकावे, रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करावा यासाठी     त्यांनी विशेष प्रयत्न केले. वसतिगृहात आल्यावर अनेक मुलींनी त्यांच्या घरचे स्वयंपाकघर देखील पाहिले नव्हते. अशा मुलींना स्वयंपाक घराची पूर्ण माहिती देऊन त्या देखील स्वतंत्रपणे स्वयंपाक करू शकतात, असा विश्वास त्यांच्यात निर्माण केला.

ही सर्व कामे करताना त्यांनी अनेक दानदाते जोडले होते. मानेवाडा मार्गावरील शाहू गार्डनचे मालकांनी तर डिसेंबरमधील ‘पांढरी काठी दिन’ कार्यक्रमासाठी दरवर्षीच शाळेचा परिसर उपलब्ध करून देत. त्यात राधाताई पांढरी काठी आणि दिवाळीच्या फराळा बरोबरच अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही प्रदान करीत असत. सेवादल शिक्षण संस्थेचे संजय शेंडे, शशांक मनोहर, माजी महापौर अनिल सोले असे कितीतरी दानदाते त्यांना मदत करीत असत. नुकतेच त्यांनी सेवादल महिला महाविद्यालयाच्या सभागृहात सुगम संगिताचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना त्यांच्या संस्थेसाठी नुकतीच जागाही मिळाली होती. राधाताईंचे यजमान पुंडलिक बोर्डे अंध विद्यालयात शिक्षक आहेत. तर मुलगी मधुरा दिल्लीमध्ये जेएनयूमध्ये उच्च शिक्षण घेत आहे.