राधिका वेमुला यांचे स्पष्टीकरण; बसप प्रवेशाचा निर्णय नाही

उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीचे राजकारण तापत असतानाच रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी भाजपच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. बसप हा समान विचाराचा पक्ष असला तरी कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर न जाता रोहितचा परिवार भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने नागपुरात आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कुठलाही न्याय मिळत नाही. केवळ जातीच्या कारणावरून दिशाभूल केली जात असल्यामुळे भाजपच्या विरोधात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बसपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्याबाबत वेळेवर निर्णय घेतला जाईल, मात्र निवडणुकीच्या बसप आमच्या विचाराचा पक्ष असल्यामुळे केवळ त्यांच्यासोबत राहणार आहे.

रोहितच्या आत्महत्येनंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती अशोक कुमार रूपनवाला  यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. हा अहवाल भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय मंत्री बंडारूदत्तात्रेय, स्मृती इराणी, आमदार रामचंद्रराव, सुशील कुमार आणि विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र त्या संदर्भात सरकार कुठलीच कारवाई करीत नाही. आमची जात कोणती यावर केंद्र सरकार राजकारण करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

चैत्यभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुद्ध धम्मात प्रवेश केला होता. त्यामुळे आता जातीवरून दिशाभूल करीत आहे आणि हे प्रकरण समोर येऊ नये त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. सरकारने रूपनवाला अहवाल तयार केला, मात्र तो भाजपने जाहीर केला नाही. तो जनतेसाठी जाहीर केला पाहिजे. मात्र त्यात भाजपसंबंधित नेत्यांवर ठपका असल्यामुळे तो जाहीर केला जात नाही, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान तेलंगणा सरकारने मदत केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

‘मी दलितच’

मी ओबीसी समाजात वाढले असले तरी मुळात दलितच आहे. मात्र अहवालात माझ्या जातीबाबत चुकीचा उल्लेख असून त्यावरून आता राजकारण केले जात आहे, असे राधिका वेमुला म्हणाल्या.