वाघांचे स्थलांतरण शिकाऱ्यांमुळे धोक्याची घंटा ठरत असली तरीही हेच स्थलांतरण वाघांचे अधिवास क्षेत्र वाढत असल्याचे सुचकसुद्धा आहे. शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव करण्यासाठी आणि अधिवास क्षेत्राच्या संरक्षणासाठी ‘रेडिओ कॉलर’ हा त्यावरचा पर्याय गेल्या काही वर्षांत भारतातसुद्धा अवलंबला जात आहे. पूर्ण वाढ झालेल्या वाघांसाठी वापरण्यात येणारी ‘रेडिओ कॉलर’ आता शिकाऱ्यांचे लक्ष्य ठरलेल्या तरुण वाघांसाठीसुद्धा वापरली जाणार आहे. वर्षभरापूर्वी विदर्भातील १५ तरुण वाघांसाठी सादर केलेल्या या प्रस्तावाची अंमलबजावणी येत्या १५ मार्चपासून होत आहे.
राज्यातील सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. या वाघांवर शिकाऱ्यांची नजर असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. विशेषत: तरुण वाघ शिकाऱ्यांचे बळी ठरत असल्याने भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहाय्याने वर्षभरापूर्वी या वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. तब्बल एक कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असल्याने राज्य सरकारने अनेक प्रश्न उपस्थित केले. विशेषत: एवढा निधी कसा जमवायचा या प्रश्नावर कॅम्पाच्या रूपाने तोडगा शोधण्यात आला. राज्याच्या मंजुरीनंतर केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाकडे हा प्रस्ताव परवानगीसाठी पाठवण्यात आला. त्यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर भारतीय वन्यजीव संस्थानच्या वैज्ञानिकांनी या सर्व प्रश्नांचे निराकरण केले. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला. त्यांच्याकडून हिरवा दिवा मिळण्यापर्यंत सुमारे चार ते सहा महिने खर्च झाले. मान्यतेच्या सर्व प्रक्रिया पार केल्यानंतर भारतीय वन्यजीव संस्थेने विदेशातून ‘रेडिओ कॉलर’ मागविण्यासाठी राज्याकडे निधी मागितल्यानंतर कॅम्पातून ७० लाख रुपये संस्थेला देण्यात आले. याच कालावधीत टेलिकम्युनिकेशन विभागाकडे फ्रिक्वेन्सी वापरण्यासंदर्भात मंजुरीसुद्धा मिळाली आणि १५ ‘रेडिओ कॉलर’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व कॉलर विदेशातून विदर्भात पोहोचल्या आहेत. यासंदर्भात आज प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) श्री भगवान आणि संस्थेचे हबीब बिलाल यांच्यात बैठकसुद्धा पार पडली. वाघांना बेशुद्ध करण्याची परवानगीसंदर्भात यावेळी चर्चा झाली.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, बोर अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, टिपेश्वर अभयारण्यातील तरुण वाघांना या ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात येणार आहेत. येत्या १५ मार्चपासून संस्थेचे वैज्ञानिक या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. केवळ टिपेश्वरमधील वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्याची प्रक्रिया एक महिन्यानंतर करण्यात येणार आहे.

रिमोटने उघडणारी ‘रेडिओ कॉलर’
रेडिओ कॉलरमध्ये नवनवे तंत्रज्ञान वापरले जात असून पूर्ण वाढीच्या मार्गावर असलेल्या वाघांना रेडिओ कॉलरमुळे फास बसू शकतो. हे लक्षात घेऊनच रिमोटच्या सहाय्याने उपग्रहाच्या माध्यमातून उघडली जाणारी रेडिओ कॉलर यावेळी वापरली जाणार आहे. या मोहिमेच्या आधी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ या वाघाची ‘रेडिओ कॉलर’ खराब झाल्याने ती बदलण्यात येणार आहे. केवळ अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील वाघांनाच नव्हे तर प्रादेशिक क्षेत्रातील वाघांनासुद्धा ‘रेडिओ कॉलर’ लावली जाणार आहे. यात कातलाबोडीच्या दोन वाघांचाही समावेश असल्याचे कळते.