27 September 2020

News Flash

मेडिकलमधील ‘रेडिओथेरपी’च्या पदव्युत्तर पदवीला विदेशात मान्यता नाही!

भारतात सर्वाधिक कर्करुग्ण मध्य भारतात आढळून येत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

नागपूरच्या मेडिकलला ‘रेडिओथेरपी’चा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग ‘एमसीआय’ची मान्यता मिळवण्यात अपयशी
राज्यातील १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांपैकी केवळ नागपूरच्या मेडिकलला ‘रेडिओथेरपी’चा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) विविध त्रुटी दूर होत नसल्याने या अभ्यासक्रमाची मान्यता २०११ साली रद्द केली होती. ती अद्याप न मिळाल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ही पदवी विदेशात ग्राह्य़ धरली जात नाही. तेथे सेवा देण्याची इच्छा असलेल्यांना या प्रकारामुळे प्रचंड मन:स्ताप होत असून या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी शासन खेळत असल्याचा आरोप वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार करीत आहेत.
भारतात सर्वाधिक कर्करुग्ण मध्य भारतात आढळून येत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. गुटखा, तंबाखूसह विविध पदार्थावर घातलेल्या प्रतिबंधानंतरही व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक मुख कर्करुग्णांची संख्या नागपुरात वाढत आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये प्रा. डॉ. क्रिष्णा कांबळे यांच्या प्रयत्नाने काही वर्षांपूर्वी रेडियोथेरपी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दोन जागा मिळाल्या होत्या. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एमसीआयने केलेल्या निरीक्षणात येथे ‘लिनियर एक्सलेटर’ हे उपकरण नसणे, रुग्णांकरिता अपुऱ्या सुविधा, उपकरणांची कमतरता यासह बऱ्याच त्रुटी आढळून आल्या होत्या. परंतु मेडिकल प्रशासनासह राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने या त्रुटी दूर करण्याची लेखी हमी ‘एमसीआय’ला दिल्याने या जागा मंजूर केल्या. हा अभ्यासक्रम असलेली मेडिकल ही राज्यातील पहिली शासकीय संस्था होती. हे राज्याला भूषणावह असल्यावरही शासनाने या अभ्यासक्रमाला कायम ठेवण्याकरिता एमसीआयने काढलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्याकडे लक्ष देण्याची गरज होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी २०११ मध्ये या अभ्यासक्रमाची मान्यता ‘एमसीआय’ने रद्द केली. त्यामुळे येथे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्या मंजुरी नसलेल्या संस्थेतील असल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
या पदवीला विदेशात मान्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध वैद्यकीय परिषद किंवा संशोधनात्मक कामाकरिता विदेशात जाता येत नाही. त्यातच शासनाकडून त्रुटी दूर होऊन हा अभ्यासक्रम पुन्हा एमसीआयकडून मंजूर न झाल्यास तो केव्हाही बंद होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसे झाल्यास ही संस्था प्रत्येक वर्षी रुग्णांच्या उपचाराकरिता मिळणाऱ्या दोन तज्ज्ञ डॉक्टरांना मुकणार आहे. तेव्हा येथे उपचार घेणाऱ्या मध्य भारतातील रुग्णांची या प्रकाराने गळचेपी होणार आहे. ही मान्यता रद्द झाल्यापासून संस्थेत ८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार शासनाला दिला कुणी? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहे.

शासनाने त्रुटी दूर करावी -डॉ. क्रिष्णा कांबळे
एमसीआयने काढलेल्या त्रुटीतील रेडियो सर्जरी, ब्रेको थेरपी, ट्रिटमेंट प्लॅनिंग सिस्टीमसह विविध प्रकारच्या सुमारे २० कोटींहून जास्तीची उपकरणे शासनाने येथे दिल्यास विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणासह रुग्णांना जागतिक दर्जाच्या उपकरणांवर उपचार घेता येणार आहे. सोबत या विभागातील प्राध्यापकांसह इतर अनुशेष भरल्यास एमसीआयची या अभ्यासक्रमाला मान्यता मिळेल, तेव्हा येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल, असे मत सुप्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. क्रिष्णा कांबळे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 1:40 am

Web Title: radiotherapy master degree not recognized in abroad
Next Stories
1 पंतप्रधानांच्या आवाहनाला केवळ साडेसात टक्केच नागपूरकरांचा प्रतिसाद
2 पाडव्याच्या खरेदी मुहूर्तातून सोने बाद!
3 विधि विद्यापीठ सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस
Just Now!
X