शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची हतबलता

महेश बोकडे, नागपूर</strong>

राज्यातील बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, शासकीय दंत महाविद्यालये, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये कमी-अधिक प्रमाणात रॅगिंग होतच असते. परंतु रॅगिंग सहन करूनही विद्यार्थी अधिकृत तक्रार करण्याचे धाडस दाखवत नसल्याने कारवाई करायची कशी, असा प्रश्न वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रशासनाला पडला आहे.

राज्यात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, तीन शासकीय दंत महाविद्यालये आणि चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालये आहेत. येथील पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा आहे. येथेच सर्वाधिक रॅगिंगचे प्रकार घडत असतात. नागपूरच्या श्री आयुर्वेद महाविद्यालयातील बीएएमएसच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांला २१ फेब्रुवारी २०१८ रोजी वसतिगृहात मानवी मूत्र पाजण्यात आल्याची तक्रार होती. त्यात आठ विद्यार्थ्यांना अटक झाली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मेडिकलच्या वसतिगृह क्र. ५ मध्येही २८ ऑगस्ट २०१८ रोजी कनिष्ठ विद्यार्थ्यांना रात्री नृत्य करायला लावण्यात आले होते. १० नोव्हेंबर २०१८ ला जीव-रसायनशास्त्र विभागाच्या एका निवासी डॉक्टरने वरिष्ठ डॉक्टर मानसिक त्रास देत असल्याची तक्रार केली होती. डिसेंबर- २०१८ मध्ये नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयातील वसतिगृहात तीन आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांतील विद्यार्थ्यांना  मारहाणही केली होती. या प्रकरणात सहा जणांची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली. परंतु चौकशी दरम्यान, विद्यार्थ्यांनी रॅगिंग झाल्याचे कबूल न केल्याने कुणावरही कारवाई करता आली नाही. यवतमाळ मेडिकलमध्ये मार्च- २०१९ मध्ये झालेल्या स्नेहसंमेलनातही रॅगिंग झाले होते.

२५ ते ३० वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना मारहाण केली. हे विद्यार्थी तक्रारीसाठी अधिष्ठाता कार्यालयात गेल्यावर त्यांचे प्रशासनाने एकले नाही. या काळात येथील चार विद्यार्थ्यांना मारहाण झाली. परंतु रुग्णालयातील नोंदीत इतर कारणांमुळे ते जखमी झाल्याचे दर्शवण्यात आले, असे तेथील काही विद्यार्थ्यांनाच सांगितले. पण तक्रार केली नसल्याने प्रशासनाला काहीही करता आले नाही.

दरम्यान, या सर्व घटनांचा विविध महाविद्यालय प्रशासनांनी मात्र इन्कार केला आहे. अनेक महाविद्यालयांत वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांचा छळ करतात. त्यानुसार कनिष्ठ विद्यार्थ्यांनी व्यायामशाळा, उपाहारगृह, ग्रंथालयात जाऊ नये. स्वतचे नाव सांगताना नेहमी अपमानकारक विशेषण वापरावे. प्लेन शर्ट- पॅन्टच वापरावे. फॅशनेबल कपडे घालू नये. कुठल्याही मनोरंजनात्मक उपक्रमांत कनिष्ठांनी सहभागी होवू नये. नवीन पद्धतीच्या बॅग न वापरता महाविद्यालयात विविध साहित्य प्लास्टिकच्या पिशवीत किंवा जुन्या बॅगमध्ये घेऊन जावे, असे निर्बंध घातले जातात.

या प्रकरणांची सहसा विद्यार्थी तक्रार करत नाहीत. कुणी बेनामी तक्रार केली व चौकशी झाली तर कोणी पुरावा वा तशी साक्ष देण्यास तयार होत नाही. त्यामुळे प्रशासनालाही कुणावर कारवाई करता येत नाही. काही प्रकरणांत तर ही रॅगिंग नव्हतीच, असेच चित्र प्रशासनाकडून रंगवले जाते.

समूपदेशनाचे प्रयत्नही अपयशी

नागपूरच्या मेडिकल, मेयो आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांत अ‍ॅन्टी रॅगिंग पथकाच्या चमूकडून अधूनमधून रात्री-अपरात्री वसतिगृहाचे निरीक्षण होते. यावेळी काही विद्यार्थ्यांना येथील छतावर एकत्र करून नृत्य करायला लावले जात असतांनाचे धक्कादायक चित्र दिसले. पथकाने दोषींवर कडक कारवाईसाठी विद्यार्थ्यांचे समूपदेशन करून त्यांना रॅगिंगची तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्नही केला. परंतु विद्यार्थ्यांनी तक्रार देणे तर सोडा वरिष्ठ विद्यार्थ्यांचा वाढदिवस असल्याने व तो मला मोठया भावासारख्या मी स्वत:च नाचत असल्याचे समितीला सांगितले. हा विद्यार्थी खोटे बोलत असल्याचे दिसत असतानाही समितीला काही करता आले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कमी-अधिक प्रमाणात रॅगिंग होत असून विद्यार्थी तक्रारीसाठी धजावत नाहीत, हे कटू सत्य आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी पीडित विद्यार्थ्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे. तक्रारकर्त्यांला सुरक्षेची हमी मिळाल्यास ते शक्यही आहे. सोबत प्रत्येक वसतिगृहात सुरक्षेचे निरीक्षण व्हायला हवे. सीसीटीव्हीचे नित्याने निरीक्षण आवश्यक आहे.

– डॉ. आशिष कोरेटी, उपाध्यक्ष, विदर्भ ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशन.