राहुल आग्रेकर हत्याकांड; आरोपींचे उज्जनमध्ये देवदर्शन

लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार दुर्गेश दशरथ बोकडे याने गुरुवारी रात्री ८ वाजेपूर्वी रायपूर येथील गुप्ता गेस्ट हाऊस लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा साथीदार पंकज हारोडे व जॅकी प्रजापती यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

राहुल आग्रेकरचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून नंतर त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे हे दोन प्रमुख आरोपी होते. आरोपी कर्जबाजारी होते व त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी अपहरणाचा कट रचला. दुर्गेश हा राहुलला ओळखत होता आणि त्यांचाही लॉटरीचा व्यवहार होता. जमीन खरेदी करण्याच्या बहाण्याने २१ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता दुर्गेश व पंकजने राहुलला सोबत घेतले. त्याच्या खुनाची योजना आधीपासूनच तयार होती. देशीकट्टा व लाकडी दांडा गाडीत ठेवला होता. ते बुटीबोरीला गेले.

पण तेथे वीटभट्टी कामगारांनी पाहिल्याने माघारी नागपुरात परतले. दुसऱ्यादिवशी जाऊन असे राहुलला सांगितले. पण त्याने नकार दिल्याने अशी संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून आरोपींनी मेडिकल चौकात शंकर आश्रमजवळ कार थांबवली. पंकजने पाठीमागचे दार उघडून लाकडी दांडय़ाने राहुलच्या डोक्यावर वार केला. दुर्गेशने दुपट्टय़ाने गळा आवळला. रक्तस्राव झाल्याने राहुल बेशुद्ध पडला. आरोपीं बुटीबोरीच्या दिशेने गेले. वाटेत ४२० रुपयांचे पेट्रोल व एका चहाठेल्यावरून आगपेटी विकत घेतली. पेटीचुहा परिसरात रस्त्याच्या कडेला गाडीतूनच राहुलला फेकले व अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. अमरावती मार्गावर चोखरधानी परिसरात गाडी उभी करून कार साफ केली. त्यानंतर जयेशला फोन करून १ कोटीची खंडणी मागितली. तेथून अमरावती मार्गाने सावनेरला गेले. रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास पोलीस पंकज व दुर्गेशच्या घरी पोहोचले.

सोनू पेंदाम नामक तरुणाने याची माहिती पंकजला फोन करून दिली. त्यानंतर ते मोबाईल बंद करून थेट छिंदवाडा, नरसिंगपूर येथे गेले. तेथे जॅकीकडे दुर्गेशने देशीकट्टा दिला. तसेच नागपुरातून एका गौतम नावाच्या मुलाकडून जॅकीच्या संदीप नावाच्या मित्राच्या बँक खात्यावर दहा हजार रुपये मागवले व कार जॅकीकडे देऊन ते नरसिंगपूरवरून इटारसी, तेथून इंदोर, उज्जन, सूरतला गेले. सूरत येथे मित्र न भेटल्याने ते पुन्हा उज्जनला परतले. त्या ठिकाणी त्यांनी महाकालेश्वर येथील मंदिरात देवदर्शन घेतले. तेथून ते झारखंड येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र पोलीस तेथे पोहोचल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी दिल्याने ते कोलकात्याला गेले. २७ नाव्हेंबरच्या संध्याकाळी हावडा ब्रीज परिसरातून त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून मेहुण्याशी संपर्क साधला. रात्री मद्यप्राशन करीत असताना पंकजने आत्मसमर्पन करण्याचा प्रस्ताव ठेवला. पण त्याला विरोध करीत दुर्गेश रेल्वेस्थानकावर निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी सीडीआरच्या मदतीने हावडा ब्रीज परिसरातील लॉजवर पंकजला अटक केली, अशी माहिती उपायुक्त राहुल माकणीकर, संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त वालचंद्र मुंडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर उपस्थित होते.

आत्महत्या करेन पण आत्मसमर्पण नाही

पंकजने आत्महत्या करण्याचा विचार व्यक्त केला, त्यावेळी दुर्गेशने ‘आत्महत्या करेन पण आत्मसमर्पण नाही’ असे सांगितले होते. तो तेथून रायपूरला आला. एका दुकानात ५ हजारांत मोबाईल तारण ठेवून २८ ला संध्याकाळी गुप्ता गेस्ट हाऊसमध्ये खोली (क्रमांक ४) घेतली. ३० तारखेला तो लॉज सोडणार होता. काल दिवसभर तो खोलीबाहेर न आल्याने कर्मचाऱ्याने मालकाला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला असता दुर्गेशने पंख्याला दुपटय़ाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत त्याचे कुटुंबीय कुणीच रायपूरला पोहोचले नव्हते.

कोटीचे स्वप्न, उरले २७५० रुपये

एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी राहुलची हत्या करणाऱ्यांना शेवटी हाती काय लागले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राहुलच्या हत्त्येनंतर आरोपी नुसते प्रवास करीत होते. एक रात्रही नीट झोपले नाहीत. अखेर एक कारागृहात गेला तर दुसऱ्याने आत्महत्या केली. शेवटच्या क्षणी दुर्गेशकडे २ हजार ७५० रुपये उरले होते. पंकज सापडला तेव्हा त्याच्याकडे ५०० रुपये होते.

राहुलच्या खात्यात ३८ कोटी रुपये

राहुल लॉटरीच्या व्यवसायासह क्रिकेट सट्टय़ाचा धंदा करायचा. तो स्वत:चीच बुक चालवायचा. त्याचे काम ग्रामीण भागांमधून चालयचे. त्याच्या एका बँक खात्यात २० कोटी रुपये आणि दुसऱ्या बँक खात्यात १८ कोटी रुपये, असे एकूण ३८ कोटी रुपये आहेत. यांचीही चौकशी करण्यात येणार असून या क्रिकेट सट्टय़ाच्या व्यवसायात त्याला कुणी साथीदार होता का, हे तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.