काहींना बळ मिळाले, काहींचे पंख छाटले

नागपूर : राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील फेरबदलात विदर्भातील जुन्या-नव्या नेत्यांचे संतुलन साधण्यात आले आहे. बदलाच्या या प्रक्रियेत  काही नेत्यांना बळ मिळाले असून काहींचे पंख छाटण्यात आले आहेत.

एकेकाळी दिल्ली दरबारी वजनदार समजले जाणारे चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांना राहुल गांधींच्या टीममध्ये स्थान मिळाले नाही. सहावेळा खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार यांना पक्ष संघटनेत दुय्यम स्थान देण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात मुत्तेमवार यांना पक्ष कार्यकारिणीत कायम सदस्यत्व देण्यात आले होते. राहुल गांधी यांनी मात्र त्यांना नव्याने संधी दिली नाही. शहरात मुत्तेमवार विरुद्ध इतर नेते अशी कायम गटबाजी सुरू असते. गेल्या निवडणुकीत मुत्तेमवार यांचा पराभव झाला. पुगलियादेखील अशाच गटबाजीत नेहमीच व्यस्त राहिले. परिणामी, दोन्ही जिल्ह्य़ात पक्ष कमकुवत होत गेला. त्याचा फटका आता या नेत्यांनाही बसला आहे. वर्धा जिल्ह्य़ात चारुलता टोकस आणि रणजीत कांबळे यांचे वर्चस्व कायम आहे. अमरावती जिल्ह्य़ात यशोमती ठाकूर या राहुल ब्रिगेडमध्ये प्रभावी भूमिकेत आहेत. वीरेंद्र जगताप यांनीही आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात हर्षवर्धन सपकाळ यांना बळ मिळाले आहे. मुकुल वासनिक बुलढाण्यात असताना सपकाळ यांना पक्षात फार संधी नव्हती, परंतु वासनिक रामटेककडे वळल्यानंतर सपकाळ यांनी स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. आता ते राहुल गांधी यांच्या टीम सरचिटणीसपदी आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात विजय वडेट्टीवार आणि सुनीता लोढिया यांना बळ दिले आहे. अकोला, वाशीम, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्य़ात फार बदल झालेले नाहीत. या जिल्ह्य़ात काँग्रेसला जुन्याच नेत्यांवर विश्वास टाकावा लागला आहे.

नागपूर लोकसभेसाठी उमेदवाराचा शोध

नागपूर लोकसभा क्षेत्रातून विलास मुत्तेमवार यांची निवडणूक लढण्याची इच्छा दिसून येते, परंतु त्यांच्या पक्षातील अनेक नेते मात्र नागपूरसाठी नवीन चेहरा शोधण्यात येत असल्याचे सांगत आहेत. त्यासाठी अनेक पर्यायी नावावर चर्चाही केली जात आहे. चंद्रपूरमध्ये गेल्यावेळी लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतरही नरेश पुगलिया उमेदवारीची आस लावून बसले आहेत. पक्षाने मात्र तेथे इतर उमेदवाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.