21 October 2018

News Flash

प्रवाशांच्या तक्रारीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

टीटीईचे भ्रमणध्वनी क्रमांक आरक्षण तक्त्यांवर द्या

भारतीय रेल्वे (प्रातिनिधिक फोटो)

टीटीईचे भ्रमणध्वनी क्रमांक आरक्षण तक्त्यांवर द्या

रेल्वेतील प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी धावत्या गाडीत प्रवाशांना प्राथमिक सुविधा मिळताना दिसत नाही. प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या सोडवण्याची रेल्वेची यंत्रणाच मोडकळीस आली आहे. प्रवाशांच्या लहान-सहान तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे म्हणून रेल्वे कंडक्टर आणि टीटीईंचे भ्रमणध्वनी क्रमांक आरक्षण तक्तांवर प्रकाशित करण्याची मागणी पुढे आली आहे.

सरकारने येत्या वर्षभरात सर्व रेल्वेगाडय़ांमध्ये जैव शौचालय बनवण्याची योजना आखली आहे. परंतु ते तुंबल्यानंतर तातडीने त्यावर उपाययोजना करण्याची यंत्रणा विकसित करण्यात येत नसल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भातील प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची रेल्वेची व्यवस्था मोडीत निघाल्याचे दिसून येत आहे.

धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांच्या तक्रारी तातडीने सोडवल्या जाण्यासाठी व्यवस्था नाही. गेल्या आठवडय़ात  नागपूर- पुरी एक्सप्रेसमध्ये याचा अनुभव आला. या गाडीने ‘एस-३’ डब्यातून (पीएनआर क्रमांक ८४२०००५३७४५) प्रवास करत असताना वाघमारे यांनी शौचालय तुंबल्याची तक्रार केली. या प्रवाशाने नागपुरातून गाडी सुटल्यावर तक्रारी केली. त्यांना शौचालयाचा वापर करायचा होता. परंतु गोंदियापर्यंत त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

रेल्वेने मार्च २०१९ पर्यंत सर्व गाडय़ांमध्ये जैव शौचालय लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु हे शौचालय तुंबल्यानंतर मोकळे करून प्रवाशांना दिलासा देणारी यंत्रणा नाही. धावत्या गाडीत कंडक्टर, टीटीई आणि आरपीएफ जवान असतात. प्रवाशांची सुरक्षा आरपीएफची जबाबदारी आहे तर इतर येणाऱ्या अडचणींना कंडक्टर, टीटीईकडून मदत मिळणे अपेक्षित आहे.धावत्या गाडीतून प्रवाशांचे सामान चोरी होत आहेत.

तसेच वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड होणे, पाणी संपणे, विद्युत यंत्रणेतील बिघाड तसेच शौचालयासंबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण होत नाही.

त्यामुळे रेल्वे प्रवाशांची कुंचबणा होत आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवल्या जात नाही. अनेक प्रवाशांना तक्रारी कुठे करावी हेच कळत नाही. रेल्वेने नागपूर- मुंबई दूरान्तो, विदर्भ, सेवाग्राम एक्सप्रेससारख्या गाडय़ांच्या आरक्षण तक्त्यांवर त्या गाडीतील कंडक्टर, टीटीईंचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक प्रकाशित करावे. तसेच संबंधित कंडक्टर, टीटीई यांचे नाव आणि भ्रमणध्वनी उद्घोषणा करण्यात यावी, अशी मागणी भारतीय यात्री संघाचे सचिव बसंत शुक्ला यांनी केली आहे.

टीटीईचे भ्रमणध्वनी द्या

दूरान्तोसारख्या गाडय़ांच्या वातानुकूलित डब्यांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. रेल्वे गाडय़ांच्या वातानुकूलित डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे. रेल्वे डब्यातील अस्वच्छता, शौचालय, विद्युत सुविधा आदींच्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्यासाठी टीटीईचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रवाशांना उपलब्ध व्हावेत, अशी मागणी भारतीय यात्री संघाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

First Published on January 9, 2018 3:09 am

Web Title: railway administration ignored passengers complaints