News Flash

जनआहाराला ‘इ-कॅटरिंग’ न जोडता रेल्वेला कंत्राटदाराचा सोस

रेल्वे स्थानकावर जनआहारच्या माध्यमातून माफक दरांत जेवण दिले जात असून ‘इ-कॅटरिंग’ म्हणजे धावत्या गाडीतून पुढील स्थानकावर जेवणाची ऑर्डर

चांगल्या सुविधेला नाकर्तेपणामुळे मर्यादा

रेल्वे स्थानकावर जनआहारच्या माध्यमातून माफक दरांत जेवण दिले जात असून ‘इ-कॅटरिंग’ म्हणजे धावत्या गाडीतून पुढील स्थानकावर जेवणाची ऑर्डर देण्याच्या योजनेला त्याला जोडून रेल्वेच्या बेस किचनला बळकटी देण्याची संधी असताना रेल्वेने कंत्राटदाराचा पर्याय निवडला आहे. यामुळे रेल्वेची ही सुविधा केवळ रेल्वे स्थानकापुरती मर्यादित होणार आहे.
तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनआहार योजना सुरू केली होती. यासाठी जुलै २०११ मध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम महामंडळाकडून (आयआरसीटीसी) नागपूर आणि बल्लारपूर येथील बेस किचन (स्वयंपाकघर) काढून रेल्वेच्या स्वाधीन केले. या योजनेतून रेल्वे स्थानकावर शाकाहारी आणि मांसाहारी भोजन उपलब्ध केले जात आहे. शिवाय, पॉकिटबंद भोजनची सुविधाही करण्यात आली आहे. रेल्वेने यासाठी काही खासगी वेंडर्स नियुक्त केले आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर भोजनालय आहे. शिवाय, काही फलाटांवर स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यास आणखी बळकटी देण्याची संधी ‘इ-कॅटरिंग’च्या माध्यमातून होती, परंतु रेल्वेने ही योजना आयआरसीटीसीकडे दिली आहे. या योजनेद्वारे लघुसंदेश किंवा दूरध्वनीवरून जेवण बुकिंग करण्याची सुविधा आहे. ‘पंॅट्री कार’ नसलेल्या काही गाडय़ांमधील प्रवाशांसाठी ही योजना होती. आता सर्व गाडय़ांमधील प्रवाशांसाठी ही योजना असून यात सध्या नागपूर स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. या स्थानकावरून देशाच्या चारही बाजूंना गाडय़ा धावतात. पाच ते पंधरा मिनिटांचा थांबा असलेल्या गाडय़ांमधील प्रवाशांना नागपूर स्थानक गाठण्यापूर्वी जेवण्याची ऑर्डर देता येणार आहे. संबंधित प्रवाशांची गाडी स्थानकावर येताच त्यांच्या डब्यात जेवण उपलब्ध केले जाईल.
मध्य रेल्वे नागपूर व बल्लारशाह येथे बेस किचन जुलै २०११ ला आयआरसीटीसीकडून रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही बेस किचनचे नविनीकरण करण्यात आले. निर्धारित केलेल्या ३५ ते ५० रुपये दराने खानपान व पॉकिटबंद जेवण भोजनालयातून किंवा रेल्वेने निश्चित केलेल्या स्टॉलवर विक्री केले जात आहे. या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या मे महिन्यात नागपूर आणि बल्लारपूर बेस किचनमधून ६९ लाख ८६ हजार ६९९ रुपये आणि १२ लाख ८७ हजार ८८३ रुपयांची विक्री झाली.
रेल्वेत जुलै आणि ऑगस्ट मंदीचा महिना मानला जातो. ईटारसी आणि भुसावळ-खंडवा सेक्शनमध्ये घडलेल्या दुर्घटनांमुळे प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली होती. तरीही या महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट जेवणाची मागणी आली. ऑगस्ट २०१५ मध्ये नागपूर बेस किचनमध्ये ३० लाख ५१ हजार ४०८ रुपयांच्या मालाची खरेदी करण्यात आली आणि या महिन्यात ४६ लाख २१ हजार ४०५ रुपयांचे उत्पन्न झाले.
अशाच प्रकारे बल्लारशाह बेस किचनमध्ये १६ लाख २३ हजार ८१० रुपयांचा माल खरेदी करण्यात आला आणि उत्पन्न २१ लाख ४९ हजार १९३ रुपये झाले, अशी माहिती रेल्वे जनसंपर्क कार्यालयाने दिली.
महाराष्ट्रात जेवणाची सुविधा हवी
रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा आणि जेवणाच्या वेळांचा ताळमेळ बसत नसलेल्या गाडय़ांमध्ये ‘पंॅट्री कार’ची सुविधा दिली आहे. बहुतांश गाडय़ांमध्ये आयआरसीटीसीच्या माध्यमातून कंत्राटाद्वारे रेल्वेत जेवण पुरवण्यात येत आहे. मात्र, ही सुविधा गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर-गया दीक्षाभूमी एक्स्प्रेस आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसमध्ये नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 6:50 am

Web Title: railway contractor option on e catering
Next Stories
1 ‘गतिमान’ प्रशासनात पत्रव्यवहाराला विलंब
2 वनखात्याच्या बचाव पथकावर प्रश्नचिन्हवाहनासाठी याचना करण्याची वेळ
3 उपकरणशास्त्र व खनिकर्म अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोनच संधी
Just Now!
X