आमूलाग्र बदलातून मंत्री व अधिकाऱ्यांना सूट
तोटय़ातील रेल्वेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढून विकासाच्या जलद गती मार्गावर चालवण्यासाठी विविध सुधारणा करण्यात येत असल्यातरी रेल्वेमंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्याकरिता ब्रिटिशांच्या काळापासून असलेल्या आरामदायी डब्यावर लाखो रुपयांचा खर्च सुरू आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर मुंबई ‘एन्ड’ला विशेष डब्यासाठी (सलून) विशेष रेल्वे मार्ग टाकण्याचा प्रस्ताव आहे.
भारतीय रेल्वेत आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. रेल्वेत थेट परकीय गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा वाढविण्याचे प्रस्तावित आहे. शिवाय रेल्वेवरील अतिरिक्त भार कमी करून खर्च कपात केली जात आहे. त्याचाच एक म्हणून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात येत आहे. एकीकडे हे पाऊल उचलले जात असताना ब्रिटिश काळापासून रेल्वे मंत्री, रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष सोयी-सुविधांवर कात्री लावण्यात आलेली नाही. रेल्वेमंत्री, रेल्वे अधिकारी यांच्या दौऱ्यासाठी असलेला विशेष डबा (इन्स्पेकशन कार)चा वापर मनमानी पद्धतीने केला जात आहे. हे इन्स्पेकशन कार सर्व अत्याधुनिक सुविधा आणि आरामदायी असते. विशेष म्हणजे हा विशेष डबा सुपरफास्ट गाडय़ांना जोडण्यात येतो. तीन महिन्यांपासून तिकीट आरक्षण केल्यानंतरही हजारो प्रवाशांना निश्चित तिकीट मिळत नाही. त्यामुळे त्यांना प्रवास टाळावा लागतो किंवा प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन सामान्य डब्यातून अक्षरश जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागते. रेल्वे अधिकाऱ्यांना ‘एसी फर्स्ट क्लास’मधून प्रवास करण्याची सोय आहे. त्यांनी संपूर्ण विशेष डबा (इन्स्पेकशन कार) घेऊन जाण्यापेक्षा एसी फर्स्ट क्लासमधून प्रवास केल्यास या डब्याऐवजी ७२ आसन क्षमता असलेल्या स्लिपर क्लासचा एक डबा त्या गाडीला जोडता येईल. त्यामुळे किमान ७२ प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. परंतु इंग्रज काळापासून रेल्वे अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या ही सुविधा तसेच इतर सुविधांवर रेल्वे मंत्रालय गप्प आहे. जलद गती गाडय़ांना प्रचंड मोठी प्रतीक्षा यादी असते. महाव्यवस्थापकांनी विशेष गाडीने प्रवास न करता तसेच अधिकाऱ्यांसाठी सलूनचा वापर न करता ‘एससी टू’मध्ये प्रवास केल्यास रेल्वेची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. सलून ऐवजी एक अतिरिक्त डबा जोडल्यास रेल्वेला महसूलदेखील प्राप्त होईल. रेल्वे मंत्रालयाने या बाबींचा विचार करावा, असे भारतीय यात्री केंद्राचे सरचिटणीस बसंत शुल्का म्हणाले.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना गाडीचे विशेषाधिकार
रेल्वे अधिकाऱ्यांसाठी केवळ एक विशेष डबा कायम सुसज्ज असतो. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांना अख्खी रेल्वेगाडी नेण्याचे विशेषाधिकार आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तसेच महाव्यवस्थापकांना देखील असे अधिकार आहेत. महाव्यवस्थापक ‘जीएम स्पेशल’ म्हणून १२ ते १५ डब्यांच्या रेल्वे गाडीने वार्षिक निरीक्षक दौरा करत असतात. यावेळी त्यांच्यासोबत सर्व विभागाचे अधिकारी असतात. प्रत्येक एका डब्यात एक अधिकारी अशी व्यवस्था असते.

सलून साईडिंग मुंबई ‘एन्ड’ला
नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर इटारसी ‘एन्ड’ला नॅरोगेज रेल्वे फलाटाच्या बाजूला सध्या विशेष डबा उभा करण्यासाठी सलून साईडिंग आहे. नॅरोगेज रेल्वे बंद झाली असून हा मार्ग काढून आणि त्याच्या बाजूला असलेले सलून साईडिंग मुंबई ‘एन्ड’ला स्थानांतरित करून फलाट क्रमांक एक सरळ करण्यात येणार आहे. सध्या हा फलाट थोडा वाकडा आहे.