खिडकीवर रांगा लावण्याची गरज नाही; एप्रिलमध्ये २९ हजार तिकीट विक्री

नागपूर : स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेने प्रवाशांसाठी फोनद्वारे अनारक्षित तिकीट विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली, परंतु ही सेवा केवळ रेल्वेस्थानकावरील ‘क्यू आर कोड’च्या (क्विक रिस्पॉन्स कोड) संपर्कात आल्यावर लागू होते.

सर्वसाधारण डब्यातून प्रवास करण्यासाठी तसेच पॅसेंजर किंवा शटल रेल्वेगाडीतून प्रवासासाठी अनारक्षित तिकीट घ्यावी लागते. ही तिकीट ऑनलाईन उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना गाडी सुटण्याच्या आधी तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहावे लागत होते. अनेकदा गर्दीमुळे तिकीट मिळण्यास विलंब होते. त्यामुळे तिकीट मिळताच प्रवासी गाडीकडे धाव घेतात. त्यामुळे अनेकदा गाडी सुटत असे किंवा अपघात होण्याची शक्यता असते. यावर पर्याय म्हणून रेल्वेने अनारक्षित तिकीट प्रवाशांच्या मोबाईल फोनवर उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली. त्यामुळे प्रवाशांना रांगेत लागण्याची किंवा तिकीट खिडकीवर जाण्याची आवश्यकता नाही. ‘यूटीएस ऑन मोबाईल अ‍ॅप’मध्ये ‘क्यू आर कोड’ (क्विक रिस्पॉन्स कोड)ची सुविधा आहे. एप्रिल  महिन्यात तब्बल २९ हजार प्रवाशांनी तिकीट खरेदी केली.  रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी, भंडारा, गोंदिया, डोंगरगड या स्थानकावर अशाप्रकारे तिकीट खरेदी केले जाऊ शकते, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के.व्ही. रमना यांनी सांगितले.