२०१९ पर्यंत काम पूर्ण करणार -दीक्षित

संपूर्ण नागपूरकरांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊन ही सेवा सुरू व्हावी म्हणून एकीकडे महामेट्रो व्यवस्थापन शर्तीचे प्रयत्न करीत असले तरी त्यांचा मार्ग सोपा नाही, सध्या अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत असून त्यात प्रामुख्याने  कामाच्या ठिकाणी असलेला वाहतुकीचा अडंगा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून निधी प्राप्त होण्यास होणारा विलंब आणि रेल्वेच्या परवानगीचा समावेश आहे.

दरम्यान, डिसेंबर २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे.

महामेट्रोतर्फे शुक्रवारी खापरी डेपो निरीक्षण  दौरा आयोजित केला होता. तेथे आयोजित पत्रकार परिषदेत दीक्षित यांनी प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या अडचणींची कल्पना दिली. ते म्हणाले शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाला वाहतूक वर्दळीचा मोठा फटका बसतो आहे. अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असल्याने वेळोवेळी ते थांबवावे लागते. गड्डीगोदाम भागात हीच मोठी समस्या ठरली आहे. त्यानंतर मेट्रोच्या डबल डेकर पुलाचा प्रश्न आहे. काही पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मेट्रो बांधून देत आहे. या कामासाठी प्राधिकरणाकडून निधी प्राप्त होण्यास अडचणी येत असून त्याचाही परिणाम कामावर होत आहे. गड्डीगोदाममध्ये भारतीय रेल्वे रुळाची अडचण आहे. तेथे रेल्वेच्या परवानगीची गरज असून ती अद्याप मिळाली नाही.

दरम्यान, बर्डी ते खापरी  (रिच-१) या दरम्यान काम योग्य पद्धतीने सुरू आहे. या मार्गावर ३ हजार ३१५ सिमेंट सेंगमेटला परस्परांशी जोडून मार्ग तयार करण्यात आला आहे. सेगमेंटचे काम पूर्ण झाले असले तरी काही कामे (पीअर्स आणि गर्डरचे) अजूनही शिल्लक आहे. मात्र, या कामावर नजर टाकल्यास मेट्रोचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल याची खात्री देते.

६ हजारावर कामगार, शेकडो अभियंते

मेट्रोच्या ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामावर एकूण ६ हजार ५०९ कामगार काम करीत असून त्यांच्यासाठी महामेट्रोने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. याशिवाय सुपरवायझर, अभियंते आणि इतर एक हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कामावरील यंत्र आणि इतर संसाधनांची संख्या शंभरच्या घरात आहे.

दोन महिन्यात मेट्रोभवन

मेट्रोच्या कामासोबतच  बर्डीतील मेट्रो भवनाचे कामही गतीने सुरू आहे. आतील काम अंतिम टप्प्यात आहे. दोन महिन्यात ते पूर्ण होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.