गारठा वाढला, शेतकऱ्यांसह नागरिक त्रस्त

नागपूर : नववर्षांच्या पहिल्याच दिवशी उपराजधानीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात झालेला अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीतून शेतकरी सावरण्याआधीच अवघ्या आठ दिवसात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून थंडी वाढल्याने सर्वसामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत.

ऐन थंडीत वर्षांच्या सुरुवातीलाच नागपूरसह अमरावती, वर्धा जिल्ह्यात गारांसह मुसळधार पाऊस झाला. बुधवारी पहाटे साखरझोपेत असणाऱ्या नागरिकांना मेघगर्जनेसह झालेल्या गारांच्या पावसाने जाग आली. या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऐन २४ तासाआधी हवामान खात्याने तसा पावसाचा अंदाज दिला होता. त्यामुळे तोडणी केलेला शेतमाल सावरण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली नाही. या नुकसानीचा अंदाज बांधण्याआधीच पुन्हा एकदा अवघ्या आठ दिवसात पाऊस परतला. गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसानंतर किमान तापमानासह कमाल तापमानही कमी झाले होते. मात्र, बुधवारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरात सकाळी बऱ्यापैकी पाऊस बरसला. दिवसभर आभाळी वातावरण आणि अधूनमधून रिमझिम पावसाने शहर ओलेचिंब झाले. अमरावती शहरात सकाळी शिरवा आला, पण नंतर उन पडले. मात्र, जिल्ह्य़ातील नेरपिंगळाई आणि मोर्शी येथे गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. वर्धा व यवतमाळ जिल्ह्य़ातही मेघगर्जना नसली तरी मुसळधार पाऊस आला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ाकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्य़ात हलक्या सरी आल्या. गोंदिया ज्ल्ह्य़िात मात्र चांगला पाऊस झाला. जिल्ह्य़ातील नागझिरा अभयारण्यातील पर्यटकांना पावसाने भिजवले. दरम्यान, उद्या मात्र आकाश बऱ्यापैकी मोकळे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.