महापालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर

पहिल्याच पावसाने शहरातील डांबरी रस्त्यांची पोलखोल केली असून महापालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते उखडले असून त्यावरील गिट्टी आणि चुरी निघाली आहे. यामुळे वाहन चालवताना अपघाचा धोका बळावला आहे. नियमानुसार नवा रस्ता बनल्यानंतर तीन वर्षांच्या आत उखडला तर संबंधित अधिकारी, कंत्राटदारांना दोषी ठरवले जाते. त्या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणावर सिमेंटचे रस्ते तयार होत आहेत तर काही प्रस्तावित आहेत. त्यामुळे महापलिकेकडून चाळणी झालेल्या या रस्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेच्या अखत्यारित येणारे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील डांबरी रस्त्यांची पहिल्याच पावसाने धूळधाण उडाली आहे. रस्त्यांवरील चुरी डोळ्यांसाठी अतिशय घातक आहे. मोठी अवजड वाहने या उखडलेल्या रस्त्यांवरून गेल्यास धुळीची चादर पसरते आणि मागाहून येणाऱ्या दुचाकीस्वाराला ती दिसत नाही. वाहनचालकांच्या नाकातोंडात धूळ जाऊन वाहन चालवणे अवघड  होते. या रस्त्यांवरून तरुण वेगाने वाहने पळवतात. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. चुरी पसरलेल्या रस्त्यांनी सध्या नागपूरकरांच्या नाकीनऊ आणले आहे.  हीच बाहेरच्या रस्त्यांची स्थिती असून अंतर्गत रस्त्यातही हीच समस्या आहे. प्रतापनगरपासून सोमलवार निकालस शाळेकडे जाणारा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा आहे. रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून काहीच दिसत नाही. विवेकानंद स्मारक ते अंबाझरी उद्यान या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या अवजड वाहनांमुळे रस्ते खराब झाल्याने मेट्रो प्रशासनाने मे महिन्याच्या अखेरीस अवघ्या आठवडय़ाभरात या रस्त्यांचे डांबरीकरण केले. मात्र, पहिल्याच पावसाने या रस्त्याची पोलखोल केली. या मार्गावरून मोठय़ा प्रमाणावर आणि वेगाने वाहतूक होते. रात्री तर काहीच दिसत नाही. अशावेळी या मार्गावरही अपघाताची शक्यता अधिक आहे. रविनगर चौक ते लॉ कॉलेज चौक, सीताबर्डी मार्ग, उत्तर अंबाझरी मार्ग यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही बिकट झाली आहे.

कंत्राटदारांसाठी सूचना

  • डांबरी रस्त्यांची कामे उन्हाळ्यातच पूर्ण व्हावीत.
  • सहा एमएमचे योग्य मिश्रण करून रस्ते तयार करावेत.
  • रस्त्याचा खालचा पाया मजबूत असावा.
  • ४० एमएमचा रस्ता तयार करावा.
  • रस्ता तयार करताना दोन थर देण्यात यावे.
  • रस्ता तयार झाल्यानंतर तीन वर्षांचा हमी कालावधी देण्यात यावा.

देश असाच खड्डय़ांचा आणि उखडलेल्या रस्त्यांचा राहणार आहे. त्याच्या बांधकामातील भ्रष्टाचारावर प्रेम करावे लागणार आहे. कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्याची मुभा नाही. आता तर माहिती अधिकारातही माहिती विचारता येत नाही. नियमानुसार बांधल्या गेलेल्या डांबरी रस्त्यांचे आयुष्य किमान पाच ते सात आणि कमाल २५ वर्षे इतके असते. मात्र, मार्चपर्यंत बिल काढायचे असल्याने काही दिवसातच रस्ते तयार होतात. सत्ताधारी असंवेदनशीलच वागणार आहेत, पण विरोधकही असंवेदनशील झाले आहेत. कालचा रस्ता आज कसा खराब झाला, असा जाब कुणी विचारायला तयार नाहीत.    – अमिताभ पावडे, सेवानिवृत्त अधिकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण.