25 September 2020

News Flash

अवकाळी पावसामुळे दिवाळीच्या उत्साहावर विरजण

घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये लक्ष्मीची मुहूर्तावरची पूजा.. व्यापाऱ्यांकडे वह्य़ांचे पूजन, नवीन वाहनांची व वस्तूंची खरेदी, मिठाई वाटप.

(संग्रहित छायाचित्र)

घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये लक्ष्मीची मुहूर्तावरची पूजा.. व्यापाऱ्यांकडे वह्य़ांचे पूजन, नवीन वाहनांची व वस्तूंची खरेदी, मिठाई वाटप.. एकमेकांना शुभेच्छा व फराळाचा आस्वाद.. अशा आल्हाददायी वातावरणात शहरात लक्ष्मीपूजन उत्साहात झाले. मात्र दिवाळीच्या दिवशी सायंकाळी ऐन पूजेच्या वेळी तासभर आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचा हिरमोड  झाला. मात्र काही वेळातच पावसाने  उसंत घेताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यंदा नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यामुळे शहरात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. रविवारी लक्ष्मी पूजनानिमित्त घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये सकाळपासून लक्ष्मीपूजनाची तयारी केली जात होती. मात्र सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास तासभर पूजन होऊनही अनेकांना फटाके उडवता आले नाही. रात्री ९ वाजताच्या सुमारास पावसाने उसंत घेतल्यानंतर शहराच्या विविध भागांत आतषबाजी करण्यात आली. फटाक्याच्या आवाजाने आणि शोभेच्या फटाक्यामुळे शहरातील वातावरण दुमदुमून गेले होते.

अन् रांगोळ्या पाण्यात वाहून गेल्या..

दिवाळीचे खास आकर्षक म्हणजे घरासमोर काढण्यात येत असलेल्या आकर्षक रांगोळ्या. घरोघरी लक्ष्मीपूजन असल्यामुळे सायंकाळी महिलांनी आपापल्या घरासमोरील अंगणात तर अपार्टमेंटमध्ये सदनिकासमोर दुपारनंतर आकर्षक व देखण्या अशा रांगोळ्या काढल्या होत्या. मात्र सायंकाळी आलेल्या पावसामुळे मोकळ्या जागेवर काढलेल्या रांगोळ्या पाण्यात पाहून गेल्या आणि अनेक महिलांच्या परिश्रम आणि आनंदावर पाणी फेरले गेले.

विविध भागात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम

शहरातील विविध भागात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना रसिकांनी चांगलीच गर्दी केली होती. विविध स्थानिक कलावंतांनी उत्स्फूर्तपणे सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या जल्लोषात दिवाळी पहाट चांगलीच रंगली. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण करतानाच लोकांजळ असलेल्या मोबाईललाही विश्रांती नव्हती. बडकस चौकात, हनुमाननगर, सायंटिफिक सभागृह, नरेंद्रनगर, महाल झेंडा चौक भागात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोमवारी सकाळी बडकस चौकातील कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, आ. मोहन मते, गिरीश व्यास आदी भाजपचे नेते उपस्थित होते.

अनाथ व वृद्धांसोबतही दिवाळी

दरम्यान, दिवसभर व्हॉट्सअ‍ॅप व एसएमएसवरून दिवाळीच्या शुभेच्छा संदेशाची देवाणघेवाण केली जात होती. शहरातील वृद्धाश्रमात आणि अनाथआश्रमात दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धानंदपेठमधील अनाथालयात आणि पंचवटीमधील वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 2:44 am

Web Title: rain diwali festival akp 94
Next Stories
1 ठाकरे, पारवेंसह १६ उमेदवार पहिल्यांदा विधानसभेत
2 पूर्व विदर्भात भाजपला ‘बावनकुळे’ फॅक्टरचा फटका
3 दिवाळीत भेसळयुक्त मिठाईचा धोका
Just Now!
X