हवामान खात्याने पावसाच्या परतीचे संकेत दिले, पण परतण्याइतका पाऊस खरोखरच पडला का, अशी स्थिती यंदाच्या पावसाळ्याने निर्माण केली आहे. महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बरसायचे आणि नंतर पाठ फिरवायची, असाच खेळ यंदा पावसाने मांडला. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडय़ाचा सामना करणाऱ्या लोकांना आज धो-धो बरसलेल्या पावसाने थोडी उसंत दिली. मात्र, उकाडय़ावर हा पाऊस पर्याय ठरेल, याची शाश्वती हवामान अभ्यासकांनाही नाही. त्याच वेळी अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवानिमित्त मूर्तीवर अखेरचा हात फिरवणाऱ्या मूर्तीकारांची मात्र या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली.
ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात बरसलेल्या पावसानंतर दुसऱ्या आठवडय़ातील पावसाने काहीशी पूरसदृश्य स्थिती निर्माण केली. मात्र, त्यानंतर पाऊसही थांबला आणि उकाडय़ात प्रचंड वाढ झाल्याने पाऊस खरोखरच पुरसदृश्य बरसला होता का, अशी स्थिती निर्माण केली. रविवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आणि महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बरसण्याचा पावसाचा रेकॉर्ड कायम ठेवला. आज, सोमवारी बरसलेल्या पावसाने मात्र ठिकठिकाणी पाणी साचले. लोखंडी पूल, नरेंद्रनगर पूल, घाटरोडच्या पुलाखाली चांगलेच पाणी साचले. विशेषत: लोखंडी पुलाखाली नेहमीप्रमाणे वाहनांची चाके बुडतील एवढे पाणी साचले होते. आजचा पाऊस जिल्ह्य़ात कळमेश्वरसह अन्य परिसरात चांगलाच बरसला.
या पावसाने शहरातील मूर्तीकार आणि विक्रेत्यांची चांगलीच दमछाक केली. गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना मूर्तीकारांच्या हाताला चांगलाच वेग आला आहे. मूर्तीवरून अखेरचा हात फिरवला जात आहे. चितारओळ याचसाठी ओळखली जाते. पावसाच्या कालावधीतच गणेशोत्सवाचे आगमन होत असल्याने गणेशमूर्तीना पावसापासून बचावासाठी शेड घातले जाते. मात्र, मोठय़ा मूर्ती प्रामुख्याने बाहेरच असल्याने आज झालेल्या पावसाने अनेक मूर्तीकारांची तारांबळ उडाली. आडवा पाऊस असला की, शेडही उपयोगी पडत नाही आणि अशीच काहीशी परिस्थिती आज चितारओळीत पाहायला मिळाली. मूर्तीकारांची जी अवस्था तीच अवस्था विक्रेत्यांचीही होती. शहरात ठिकठिकाणी मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यांनाही अचानक कोसळलेल्या पावसाने बचावासाठी चांगलीच धावपळ करावी लागली.
सप्टेंबरमधील पावसाच्या दमदार आगमनाने हवामान खाते आणि हवामान अभ्यासकांचे सप्टेंबरमध्ये कोसळणाऱ्या पावसाचे अंदाज खरे ठरतील, असे दिसून येत आहे.