नागपूर : विदर्भासह संपूर्ण राज्यात येत्या रविवारी पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. तीन दिवसांपूर्वी तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असतानाच तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. चढत चाललेला तापमानाचा पारा पुन्हा कमी होऊ लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे त्याचा परिणाम ढगाळ

वातावरणात झाला आहे. त्यामुळे रविवारपासून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह््यासह सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह््यात रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. तापमानवाढीला सुरुवात झाली आहे, असे वाटत असताना अचानक तापमानात घट होते.

कमाल तापमानासह किमान तापमानातही चढउतार होत आहे. दोन ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात घट होत आहे. नागपुरात पावसाचा अंदाज नसला तरीही ढगाळ वातावरण मात्र कायम असणार आहे, असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे.