आज पुन्हा  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

नागपूर : सरत्या वर्षांत आणि नवीन वर्षांच्या स्वागतावेळीही खराब हवामानाने पाठ सोडली नाही. हवामान अभ्यासकांनी दिलेला पावसाचा अंदाज खरा ठरला आहे. ३१ डिसेंबरची सुरुवातच पावसाने झाली. उपराजधानीसह विदर्भात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. गारठा कायम असल्याने शेकोटय़ांच्या आधाराशिवाय पर्याय नव्हता.

हवामान खात्याने एक आणि दोन जानेवारीला पावसाचा इशारा दिला होता. तर हवामान अभ्यासकांनी मात्र ३१ डिसेंबरपासूनच विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडय़ातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला. अभ्यासकांचा अंदाज खरा ठरला आहे. ३१ जानेवारीला पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच होत्या. संपूर्ण शहरातच पाऊस होता. यामुळे किमान तापमानात घट झाली असली तरीही वातावरणात गारठा आहे. शनिवारी याच शहराचे किमान तापमान ५.१ तर रविवारी ५.३ अंश सेल्सिअस इतके होते. रविवापर्यंत विदर्भातील वर्धा, ब्रम्हपुरी, अकोला, अमरावती, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ या शहरातील तापमान दहा अंश सेल्अिसच्या आत होते. मंगळवारी किमान तापमानात ७.३ अंश सेल्सिअसची वाढ होऊन ते १३.८ अंश सेल्सिअस इतके झाले. अमरावती येथेही सकाळी दहा वाजताच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. अकोला, गोंदिया, चंद्रपूर याठिकाणीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान अभ्यासकाच्या अंदाजानुसार बुधवारी विदर्भासह मराठवाडय़ातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे.