बाजारपेठा सज्ज, २० टक्क्यांनी वाढले दर

नागपूर : पुढील दहा दिवसांनी येणाऱ्या रक्षाबंधनासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. परंतु यंदा राख्या महागल्याने बहिणींना महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. बाजारात काही प्रमाणात अजूनही चीनच्या राख्या असल्या तरी भारतीय बनावटीच्या राख्यांची मागणी जास्त आहे. विशेष करून यंदा कॉम्बो पॅक राख्या आल्या असून २० टक्क्यांनी दर वाढले आहेत.

बाजारपेठेत अगदी २० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. कॉम्बो पॅकमध्ये भावासाठी संदेश देता येत असून यामध्ये भावाचा फोटोही लावण्याची सोय आहे. तसेच चॉकलेट आणि भेटवस्तू ठेवण्यासाठी जागा  आहे. आकर्षक अशा डब्ब्यात ते उपलब्ध आहेत. जवळपास पाचशे ते दोन हजारांच्या घरात त्यांच्या किंमती आहेत.

तसेच लहान मुलांसाठी कार्टून राखी आली आहे. यामध्ये डोरेमॉन, सिंचॅन, छोटा भीम, मोटू पतलूचे पात्र साकारण्यात आले आहेत.याच्या किंमती चाळीस ते ८० रुपयांच्या घरात आहे. नाव लिहिलेली राखी, एक्रेलिक बोर्ड फ्रेम, वूडन अथवा बांबूच्या राख्याही उपलब्ध झाल्या आहेत. माणिक आणि खडय़ांच्या राख्यांचीही मागणी जोरात आहे. टाळेबंदीमुळे सर्वानाच आर्थिक चणचण जाणवत असल्याने यंदा राखीचा सण साधेपणाने साजरा करण्याकडे अनेकांचा कल आहे.

५० टक्केच राख्या दाखल

दरवर्षी इतर राज्यातूनही नागपुरात मोठय़ा संख्येने राख्या येत असतात. मात्र यंदा त्या केवळ पन्नास टक्के आल्या आहेत. आर्थिक अडचणीमुळे स्थानिक दुकानदारांनी  पूर्व नोंदणी कमी केली आहे. मालवाहतूक व इतर खर्च वाचवण्यासाठी  स्थानिक राख्यांच्या खरेदीवर भर दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.