28 September 2020

News Flash

नागपूरनगरीत ‘अयोध्येचा आनंद’!

शहरातील विविध मंदिरात प्रभू रामाची आराधना

बडकस चौकात जल्लोष करताना महिला.

चौकाचौकात रांगोळ्या, भगव्या पताकांची आरास; शहरातील विविध मंदिरात प्रभू रामाची आराधना

नागपूर : अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन आज झाले. अयोध्येचा हा आनंद नागपुरातही मोठय़ा उत्साहात साजरा झाला. शहरभरातील राम भक्तांनी  चौकाचौकात भगव्या पताका लावल्या. रामधून वाजली. भजन गायन झाले.  अनेक मंदिरात प्रभू रामाची मनोभावे पूजा करण्यात आली.

पोद्दारेश्वर राम मंदिर परिसरात  भगव्या रंगाच्या पडद्यांनी व्यासपीठ तयार करून भजन-गायन झाले. मिठाई वाटण्यात आली. प्रस्तावित मंदिराच्या वास्तूची रांगोळी रेखाटून गांधी गेट शिवाजी पुतळा येथे  भूमिपूजनाचा जल्लोष साजरा करण्यात आला.  शहीद गोवारी उड्डाणपूल, व्हेरायटी चौक येथेही भगव्या रंगाचे झेंड लावण्यात आले होते. उत्तर नागपुरात बजरंग दलाने रॅली काढली. याशिवाय पश्चिम नागपुरात देखील मुखपट्टी आणि शारीरिक अंतर राखून रॅली काढण्यात आली.  गोकुळपेठ चौक, प्रतापनगर, बडकस चौक यासह अनेक ठिकाणी भगवे मंच तयार करण्यात आले होते.

संस्कार भारती  परिवाराशी संबंधित संघटनेने २० पथक तयार केले. त्यात १०० मुले होती. या पथकाने अनेक भागात रांगोळ्या रेखाटल्या. अनेक चौकात प्रस्तावित राम मंदिराच्या प्रतिकृती रांगोळीतून काढण्यात आल्या.  अनेकांनी घरातील टीव्हीसमोर बसून भूमिपूजनाचा ऐतिहास क्षण याची देही याची डोळा अनुभवला.

बडकस चौक, वर्धमाननगर, मानेवाडा चौकात आयोजन

श्री छत्रपती संभाजी महाराज चौक मानेवाडा येथे  नगरसेविका मंगला खेकरे व देवेंद्र दस्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीराम यांचे पूजन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम नागपूर द्वारा प्रभू श्रीराम पूजन कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी कमलेश पांडे, योगेश पाचपोर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वर्धमाननगर चौक येथे स्वच्छ भारत अभियान नागपूर शहर द्वारा आयोजित कार्यक्रमात आमदार कृष्णा खोपडे, भोला सहारे, संजय अवचट, किशोर भागडे यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम यांचे पूजन करण्यात आले. दक्षिण नागपूर हुडकेश्वर येथील संतोषी नगरात प्रभू श्रीरामचंद्र यांचा जयजयकार करण्यात आला आणि मिठाई वाटण्यात आली. बडकस चौक, महाल नागपूर येथे बुंदीचे लाडू वाटण्यात आले. कारसेवकांमुळे ५०० वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण दटके यांनी दिली.

संघ मुख्यालयातही जयघोष

श्रीराम जन्मभूमी आंदोलनाला महत्त्वाची दिशा देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या मुख्य द्वाराशी ‘जय श्रीराम’ लिहिलेली एक मोठी रांगोळी काढण्यात आली. यासोबतच प्रस्तावित राम मंदिराची प्रतिकृती असलेली रांगोळी आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख दिवंगत अशोक सिंघल आणि राम जन्मभूमी आंदोलनाशी निगडित मोरोपंत पिंगळे यांच्या प्रतिमाही रांगोळीतून रेखाटण्यात आल्या होत्या.

नितीन गडकरी यांचे घरीच श्रीराम पूजन

अयोध्येत ऐतिहासिक श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  नागपुरातील त्यांच्या घरी सहकुटुंब श्रीरामाचे पूजन केले. याप्रसंगी गडकरी यांच्या संपूर्ण कुटुंबाने रामरक्षा पठण, हनुमानचालिसा पठण करून आरती केली.

स्वप्न  लवकरच पूर्णत्वास जाईल

अयोध्येतील राम मंदिर हे भारत देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आज महत्त्वाचे पाऊल पडले आहे.  याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पिढय़ांनी पाहिलेले हे स्वप्न  लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्वास आहे.

– संदीप जोशी, महापौर

आनंदाचा क्षण

वैयक्तरित्या हा क्षण माझ्यासाठी आनंदाचा आहे. भुतकाळातील सर्व कुटुता विसरण्याची ही वेळ आहे. बघूया मुस्लीम बांधव त्याला कसे घेतात. काशी आणि मुथरा येथील हिंदूंची आस्थास्थाने मुस्लिमांनी  स्वत:हून द्यायला हवीत.

– मा.गो. वैद्य, संघ विचारवंत

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 1:13 am

Web Title: ram mandir bhoomi pujan celebration in nagpur zws 70
Next Stories
1 Coronavirus : पुन्हा १५ बाधितांचा मृत्यू!
2 मॉल उघडले, व्यावसायिक संकुले बंदच!
3 लोकजागर : विकासाचे ‘विलगीकरण’!
Just Now!
X