|| मंगेश राऊत

कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे आदेश :- अयोध्या येथील विवादित राम मंदिराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल केव्हाही जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर  राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ‘हायअलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

या खटल्याची सुनावणी  सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे झाली. या घटनापीठाचे प्रमुख सरन्यायाधीश रंजन गोगोई आहेत. ते १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत असून त्यापूर्वी कधीही निकाल येण्याची शक्यता आहे. हा निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे, हे सांगता येणार नाही. पण, सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना राम मंदिर प्रकरणी निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी शांतता बाळगण्याचे आवाहन केले.

या निकालानंतर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, याकरिता पोलीस विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सोमवारी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने सोमवारी नागपूर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय व अधीक्षक राकेश ओला यांनी सायंकाळी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची माहिती आहे.

ईद, गुरुनानक जयंतीची कारणे

आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलावण्यामागचे कारण अनेक अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी १० नोव्हेंबरला असलेली ईद-ए-मिलाद व गुरुनानक जयंतीच्या बंदोबस्तासाठी ही बैठक घेण्यात आली, असे सांगितले. पण, ही बैठक  राम मंदिर प्रकरणातील निकालाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली, असे पोलीस वर्तुळातूनच सांगितले जात आहे.