नागपूर : अयोध्यामधील राम मंदिर निर्माण करणे  हे राष्ट्रकार्य आहे. ते पूर्ण झाल्यावर प्रभू रामचंद्र आणि हनुमानाच्या कृपेने झाले असे समजावे आणि त्यांचा आदर्श ठेवत समाजात आचरण करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

राजाबाक्षा हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेच्यावेळी हनुमानाच्या रथाची पूजा केल्यानंतर भाविकांसोबत भागवत यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.  हनुमान सर्वगुण संपन्न  होते.  प्रभूरामचंद्राचे सेवक म्हणून  त्यांची ओळख होती. चांगल्या कामाना प्रोत्साहन देण्याचे काम प्रभूरामचंद्राने केले आहे. समाजात आपण जे कार्य करतो ते सर्व राष्ट्रकार्य आहे. त्यामुळे राम मंदिर निर्माण हे राष्ट्रकार्य असून ते निर्माण झाल्यावर प्रभू रामचंद्र आणि हनुमानाच्या कृपेने झाले असे समजावे आणि त्यांचा आदर्श ठेवत समाजात आचरण करावे व समाजात त्याचे पालन करावे असा संकल्प प्रत्येकाने  करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मुख्य रथ असलेल्या हनुमान रथाची पूजा करण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी मंदिरातून जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले आणि आरती केली.